आपली माती अन् आपली माणसं कर्तव्याच्या वाटेवरचा संयमी स्तंभ : बालाजी गाजेवार
प्रत्येक मातीची एक स्वतंत्र ओळख असते आणि त्या मातीत घडणाऱ्या माणसांचीही! काही माणसं आपल्या कर्तृत्वाने मोठी होतात, काही पदामुळे ओळखली जातात, काही प्रसिद्धीच्या झोतात राहतात; मात्र काही माणसं अशी असतात की, ती कोणताही गाजावाजा न करता आपल्या वाट्याचे काम प्रामाणिकपणे करीत राहतात आणि निवृत्तीनंतर मागे वळून पाहिल्यावर त्यांच्या पावलांचे ठसे किती खोलवर उमटले आहेत, याची जाणीव समाजाला होते. बालाजी गाजेवार हे अशाच माणसांपैकी एक.
शांत स्वभाव, संयमी वृत्ती, आध्यात्मिक ओढ, साधी राहणी आणि उच्च विचार यांचा सुरेख मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो. पोलीस खात्यासारख्या शिस्त, कठोरता, तत्परता आणि प्रसंगी आक्रमक निर्णयक्षमतेची मागणी करणाऱ्या क्षेत्रात काम करताना अशा स्वभावाचे व्यक्तिमत्त्व काहीसे वेगळे वाटते. मात्र, वेगळेपण हे कमजोरीचे लक्षण नसते; उलट तेच कधी कधी व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद ठरते...








