
ग्रामस्वच्छता, ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी आवाज हरपला
नांदेड, प्रतिनिधी| ग्रामस्वच्छता, ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीशी आयुष्यभर नाते जोडून कार्य करणारे स्वच्छतादूत माधवराव पाटील शेळगावकर यांचे १ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने स्वच्छता व ग्रामविकास चळवळीतील एक अभ्यासू, संवेदनशील आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.


‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’च्या माध्यमातून त्यांनी स्वच्छतेला केवळ परिसर स्वच्छ ठेवण्यापुरते मर्यादित न ठेवता त्याला व्यापक सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली. लोकसहभाग, पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि सामाजिक जाणीव या बाबींना त्यांनी आपल्या कार्यातून प्राधान्य दिले.


राज्यस्तरीय ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील अनुभव आणि ग्रामविकासाचा विचार विविध व्यासपीठांवर मांडला. कोलंबो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेसह देशातील विविध मंचांवर त्यांनी ग्रामस्वच्छता व ग्रामविकासाची भूमिका प्रभावीपणे मांडली. शेळगाव गौरी गावाच्या विकासातही त्यांनी लोकसहभाग, स्वावलंबन आणि सामाजिक जाणीवेवर आधारित योगदान दिले.


शेतकरी कुटुंबातून आलेल्या शेळगावकर यांचे शेतकरी प्रश्नांशीही जवळचे नाते होते. कै. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा त्यांच्या कार्यावर मोठा प्रभाव होता.


‘माझी ग्रामविकासाची शेती’ या आत्मचरित्रातून त्यांनी ग्रामविकास, सामाजिक परिवर्तन आणि सार्वजनिक जीवनातील अनुभव शब्दबद्ध केले. त्यांच्या कार्याची दखल घेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, यशवंत पंचायत राज समृद्ध ग्राम पुरस्कार आणि पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता.
प्रभावी वक्तृत्व, संयमी भाषा आणि समोरच्या व्यक्तीचा सन्मान राखणारा संवाद ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. विचार ठाम असतानाही त्यांच्या संवादात कटुता नव्हती. त्यामुळे ते केवळ स्वच्छतादूत म्हणून नव्हे, तर माणुसकी, सामाजिक समता आणि ग्रामविकासाचा विचार जपणारे कार्यकर्ते म्हणून स्मरणात राहतील
त्यांच्या निधनाने स्वच्छता चळवळीतील एक अनुभवी आणि प्रभावी आवाज शांत झाला आहे. मात्र, त्यांनी रुजविलेली स्वच्छतेची जाणीव, ग्रामविकासाची तळमळ आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. स्वच्छतेला चळवळीचे रूप आणि ग्रामविकासाला माणुसकीची दिशा देणाऱ्या या निर्मळ व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
