हडसणी फाट्यावर भीषण अपघात; ३ ठार, एकाची प्रकृती चिंताजनक

संतप्त ग्रामस्थांचा प्रशासनाला घेराव

हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील हडसणी फाटा येथे बुधवारी (22 एप्रिल) रात्री सुमारे 9 वाजता झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 12 केएन 2509 क्रमांकाच्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने हडसणी फाट्यावर दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. पहिल्या दुचाकीवरील रेखाबाई भाऊराव नरवाडे (42), त्यांचा मुलगा यशवंत नरवाडे (23) आणि नणंद अनुसया लोणाळे (43) यांचा जागीच मृत्यू झाला.

दुसऱ्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी भोकर येथील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसऱ्या जखमीला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते.

हडसणी फाटा हा सध्या अपघातांचा केंद्रबिंदू बनला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 21 एप्रिल रोजीही याच ठिकाणी दोन अपघात झाले होते आणि दुसऱ्याच दिवशी हा भीषण अपघात घडला. यापूर्वीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनी येथे गतिरोधक, रेडियम इंडिकेटर्स आणि हायमास्ट लाईट बसवण्याची मागणी अनेकदा केली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सततच्या अपघातांमुळे गुरुवारी (23 एप्रिल) ग्रामस्थ आक्रमक झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत, “जोपर्यंत रस्ता रुंदीकरण आणि ठोस सुरक्षा उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवू,” असा इशारा देण्यात आला. मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

या भीषण घटनेमुळे हडसणी परिसरात शोककळा पसरली असून नरवाडे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद आघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!