‘एक दिवस, एक तास, एक साथ’मधून नांदेड जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर

हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; गावोगावी राबविली व्यापक स्वच्छता मोहीम
नांदेड| ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत आयोजित ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमाला नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील गावागावांत अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम राबविली.

जिल्ह्यातील पंचायत समित्या, ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. अनेक ठिकाणी स्वच्छतेची शपथ घेऊन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी हातात झाडू घेत प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला.

या उपक्रमात महाविद्यालयीन युवक, शालेय विद्यार्थी, महिला, महिला बचत गट, युवक मंडळे, ग्रामपंचायत कर्मचारी व अधिकारी, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत आपल्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली. मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

स्वच्छतेसोबत जनजागृतीवरही भर
या मोहिमेमुळे सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये, शाळा आणि ग्रामपंचायत परिसर स्वच्छ झाले. त्याचबरोबर स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण झाली.

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता स्वच्छता ही प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावी, यासाठी नागरिकांनी सातत्याने सहभाग नोंदवावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सामूहिक सहभागामुळे ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रमाला जिल्हाभर व्यापक लोकसहभाग मिळाला. स्वच्छ आणि सुंदर नांदेडच्या दिशेने या उपक्रमातून नागरिकांच्या सहभागाची नवी ऊर्जा निर्माण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!