पीक कापणी प्रयोगासह जलतारा प्रकल्पाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहावे; राहुल कर्डिले यांचे निर्देश
नांदेड| दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेती, पाणी, चारा व महसूलविषयक बाबींवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करावे, तसेच नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

देगलूर तालुक्यातील कुशावाडी येथे शेतकरी सुरेश हणमंत हिंगोले यांच्या गट क्रमांक १२३ मध्ये आयोजित पीक कापणी प्रयोगाची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत उपस्थित होते. पीक कापणी प्रयोगाची कार्यपद्धती, नोंदणी आणि प्रयोगाची अचूकता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आवश्यक सूचना केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी गीते, तहसीलदार भरत सूर्यवंशी, निवासी नायब तहसीलदार गिरीश सर्कलवाड, नायब तहसीलदार गणेश रायेवार, तालुका कृषी अधिकारी सोनकांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

येरगी येथे जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन
यानंतर येरगी येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. शेतातील पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे, मातीची धूप रोखणे आणि दुष्काळी परिस्थितीत जलसुरक्षेला बळकटी देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

जलतारा प्रकल्पामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होऊन शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारण्यास हातभार लागणार आहे. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी सहसचिव (भू.सं.) ग्रामीण विकास मंत्रालय पी. नरहरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी श्रीकांत बलदे यांच्यासह संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना
दरम्यान, जिल्हाधिकारी कर्डिले यांनी देगलूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय प्रमुखांची आढावा बैठक घेतली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चारा, शेती आणि महसूलविषयक परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शासनाच्या विविध दुष्काळ निवारण उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि तालुक्यातील परिस्थितीवर नियमित लक्ष ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा वेळेत मिळतील यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!