
हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांड्यातील हृदयद्रावक घटना


हिमायतनगर | मेव्हण्याच्या लग्नासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाने पत्नीची चाकूने हत्या करून नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तिन्ही लहान मुले पोरकी झाली आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पायल विनोद राठोड (वय ३५) व पती विनोद रंगराव राठोड (वय ४०, रा. धारजणी फुलवाडी तांडा, ता. भोकर) हे आपल्या तीन मुलांसह बोरगडी तांडा नं. १ येथे चुलत भावाच्या लग्नासाठी आले होते. लग्नसमारंभात दोघेही आनंदात वावरत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.


मात्र, दिनांक 11 च्या मध्यरात्रीच्या सुमारास विनोद राठोड यांनी पत्नीला घराबाहेर बोलावून काही अंतरावर नेले आणि धारदार चाकूने तिच्यावर वार करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.


यानंतर सकाळी धानोरा शिवारातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत विनोद राठोड यांचा मृतदेह आढळून आला. पत्नीची हत्या केल्यानंतर भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी वैजंने, पोलिस निरीक्षक अमोल भगत, पोलिस पाटील चक्रधर काईतवाड, निकेश राठोड, संदेश तुळशे, सरपंच तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणाची नोंद घेण्याची प्रक्रिया पोलिस ठाण्यात सुरू होती. घटनेचा पुढील तपास हिमायतनगर पोलीस करत आहे.
