
एकाचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी; स्पीड ब्रेकरच्या मागणीकडे महामार्ग विभागाचे दुर्लक्ष
हिमायतनगर : अनिल मादसवार| हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाटा येथे भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याची भीषण घटना शनिवार, दि. २५ जुलै रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगरकडून भोकरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच २६ सीपी ८८६० ने सोनारी फाटा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत टीएस १८ जी १८१७ आणि एमएच २६ बीएस ५२६९ क्रमांकाच्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले.



या अपघातात सोनारी येथील शेख जिकरान शेख सिराज आणि शेख सोहेल शेख जहीर हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना सरसम येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. मात्र, नांदेडला नेत असताना शेख सोहेल शेख जहीर यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर शेख जिकरान शेख सिराज यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, बीट जमादार नागरगोजे, बालाजी जाधव, पठाण आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



स्पीड ब्रेकर कधी बसणार? नागरिकांचा संतप्त सवाल – हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावर सोनारी फाट्यासह अनेक गावांच्या मुख्य चौकात आणि बसथांब्यांजवळ स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला आहे. तरीही गावांच्या मुख्य ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास महामार्ग विभाग टाळाटाळ का करीत आहे? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा सवालही संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.
