
हिमायतनगर| हिमायतनगर -सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुचाकी व आयचर ट्रक यांच्यात भीषण अपघात घडला आहे. या घटनेत एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.


हिमायतनगर शहरातील शासकीय धान्य गोदामातून मौजे कोठा व एकंबा गावाकडे रेशनचे धान्य घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक MH26-7776 ने सिरपल्ली–सिरंजनी मार्गे येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH29-AZ 4538 ला जोरदार धडक दिली. ही घटना एचपी गॅस गोडाऊनसमोर मुख्य रस्त्यावर घडली.



या अपघातात दुचाकिवरील गणेश सदाशिव जाधव वय 55 वर्ष राहणार सिरपल्ली जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील शंकर विठ्ठल वानखेडे वय 40 वर्ष रा सिरपल्ली हि व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. अपघात एवढा भयंकर होता की आयचर ट्रकच्या समोरील भागात दुचाकी अडकल्याचे घटनास्थळी दिसत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.



येथे डॉ. संदीप वागतकर यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील तपास हिमायतनगर पोलीस करत आहेत. व्रत्त लिहीपर्यंत या अपघात संदर्भात हिमायतनगर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती.


