
*अखेरच्या टप्प्यातील अविस्मरणीय प्रवास*



अमरनाथ यात्रेचा शेवट आता अगदी जवळ आला होता. दोन दिवसांनंतर प्रत्येकजण आपल्या घरी परतणार होता. मनात बाबा बर्फानींच्या दर्शनाचे समाधान होते, तर दुसरीकडे सहप्रवाशांचा सहवास संपणार याची हळवी जाणीवही होती.रात्रीच ठरल्याप्रमाणे पहाटे तीन वाजता सर्वांना वेकअप कॉल देण्यात आला. दिवसभराच्या धावपळीमुळे प्रत्येकाची झोप गाढ झाली होती, त्यामुळे कुणालाही उठवण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. सर्वांनी वेळेत तयारी केली आणि चार जणांनी मिळून एक ऑटो करत अमृतसर रेल्वे स्थानक गाठले. प्रत्येकी ऑटोचे २५० रुपये भाडे देऊन आम्ही वेळेआधीच स्टेशनवर पोहोचलो. सर्वांचे रेल्वे आरक्षण निश्चित असल्यामुळे कोणतीही धावपळ किंवा तणाव नव्हता.



पहाटे पावणे पाच वाजता शताब्दी एक्सप्रेसने आमचा दिल्लीकडे प्रवास सुरू झाला. लुधियाना येथे नेहमीप्रमाणे सरदार कुलदीपसिंघ आमच्या स्वागतासाठी हजर होते. त्यांनी प्रेमाने छोले-कुलचे आणि खिरीची व्यवस्था केली होती. त्यांचा आग्रह इतका मनापासून होता की, कुणालाही नकार देता आला नाही. गप्पांच्या ओघात त्यांनी सर्व यात्रेकरूंना सांगितले की, “आम्ही दरवर्षी जवळपास तीनशे जणांचा जत्था घेऊन नांदेडला सचखंड श्री हजूर साहिबच्या दर्शनासाठी जातो. त्या वेळी दिलीपभाऊ आमच्या सर्वांसाठी इडली-सांबारची व्यवस्था करतात.” सेवाभावातून निर्माण झालेली ही मैत्री सर्वांनाच भावून गेली.


*दिल्लीतील पहिली परीक्षा – नियोजनाची* सकाळी अकराच्या सुमारास आम्ही नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर उतरलो. गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर लागली होती, तर आमच्या एसी बसेस प्लॅटफॉर्म क्रमांक १६ च्या बाहेरील पार्किंगमध्ये उभ्या होत्या. सर्वात मोठे आव्हान होते बॅगा उचलून नेण्याचे.हमाल एका बॅगेसाठी २०० रुपये मागत होते. त्यात दिल्ली दर्शन झाल्यानंतर पुन्हा तेच सामान स्टेशनवर आणण्यासाठी वेगळा खर्च करावा लागणार होता. अशा वेळी अनुभव कामी आला. दिल्लीमध्ये शिक्षणासाठी राहणाऱ्या माझ्या परिचयातील एका विश्वासू विद्यार्थ्याला सहा मित्रांसह बोलावून घेतले. प्रत्येकी बॅगेसाठी फक्त १०० रुपये मानधन ठरवून सर्व सामान त्यांच्या ताब्यात दिले. प्रत्येक बॅग मोजून दिली आणि त्या जागेवरून हलायचे नाही, अशी स्पष्ट सूचना केली. दहा तास त्या सर्वांनी अत्यंत जबाबदारीने पहारा दिला.


सामानाची चिंता मिटताच आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक १६ च्या दिशेने निघालो. बाहेर पार्किंगमध्ये दोन वातानुकूलित बसेस तयार होत्या. दिल्लीचा प्रचंड उकाडा लक्षात घेऊन जम्मू, अमृतसर आणि दिल्ली येथे एसी बसचे नियोजन मी नेहमीच करतो. बाहेर कितीही कडक उन्ह असले तरी प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, एवढाच त्यामागचा हेतू असतो.
*बिर्ला मंदिर – श्रद्धा आणि स्थापत्याचा संगम* दिल्ली दर्शनाची सुरुवात बिर्ला मंदिरापासून झाली. लक्ष्मीनारायणांना समर्पित हे मंदिर बिर्ला उद्योगसमूहाने उभारले आहे. १९३९ मध्ये बांधलेल्या या मंदिरात भारतीय स्थापत्यकलेचे सुंदर दर्शन घडते. या मंदिराच्या उद्घाटनावेळी महात्मा गांधी यांनी ते सर्व जाती-धर्मातील लोकांसाठी खुले ठेवण्याची अट घातली होती. आजही त्या विचारांचा सन्मान येथे जपला जातो.
*राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे यांचे आदरातिथ्य* दुपारच्या भोजनाची व्यवस्था नांदेडचे राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे यांनी त्यांच्या दिल्लीतील ‘ब्रह्मपुत्र’ या शासकीय निवासस्थानी केली होती. मात्र गुगल मॅपवरही नेमका पत्ता सापडत नव्हता. त्यावेळी साहेबांचे सहकारी आणि माझे मित्र दत्ता कुलकर्णी यांनी नांदेडहून सतत फोनवर संपर्क ठेवत आम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवले.दिल्लीतील त्यांचे स्वीय सहाय्यक संजीवकुमार अधिकारी यांनी स्वतः पुढे येऊन सर्व यात्रेकरूंचे स्वागत केले. अत्यंत रुचकर आणि प्रेमाने वाढलेले भोजन सर्वांनी मनसोक्त आस्वादले. साहेबांसाठी आणलेले स्मृतिचिन्ह संजीवकुमार अधिकारी यांच्या स्वाधीन करण्यात आले.
डॉ. अजित गोपछडे यांनी दूरध्वनीवरून यात्रेकरूंना शुभेच्छा देताना सांगितले, “दिलीपभाऊंच्या माध्यमातून दरवर्षी या पवित्र यात्रेच्या सेवेत सहभागी होण्याची संधी मिळते, हे आमचे भाग्य आहे. यात्रेकरूंची सेवा हीच आमच्यासाठी खरी पूजा आहे.”भोजनानंतर सर्वांनी एकत्र प्रार्थना केली आणि भजन गायले. त्यामुळे वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक प्रसन्नता निर्माण झाली.
*राजधानीचे वैभव* पुढील प्रवासात बसमधूनच इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय आणि इतर अनेक महत्त्वाच्या शासकीय इमारतींचे दर्शन घेत आम्ही कुतुबमिनारकडे रवाना झालो.प्रत्येकी चाळीस रुपये प्रवेश शुल्क भरून आम्ही कुतुबमिनार संकुलात प्रवेश केला. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेला हा मनोरा दिल्लीच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. कुतुबुद्दीन ऐबकने बाराव्या शतकात त्याचे बांधकाम सुरू केले आणि पुढे इल्तुतमिश व फिरोजशाह तुघलक यांनी ते पूर्णत्वास नेले.७२.५ मीटर उंच असलेल्या या मनोऱ्यात एकूण ३९९ पायऱ्या आहेत. पूर्वी पर्यटकांना वर जाण्याची परवानगी होती; मात्र काही दुर्घटनांनंतर ती बंद करण्यात आली. मनोऱ्यावरील नक्षीकाम, शिलालेख आणि स्थापत्यकला पाहून सर्वजण इतिहासाच्या वैभवात हरवून गेले.
*लोटस टेम्पल – शांततेचा संदेश* यानंतर आम्ही लोटस टेम्पलला भेट दिली. कमळाच्या आकारात बांधलेले हे बहाई उपासना मंदिर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. येथे कोणत्याही धर्माची बंधने नाहीत. कोणतीही मूर्ती नसलेल्या या मंदिरात शांत बसून ध्यान करण्याची मोकळीक आहे. आधुनिक स्थापत्य आणि आध्यात्मिक शांततेचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळतो.
*अनुभवाचा विजय* सायंकाळी साडेआठच्या सुमारास आम्ही पुन्हा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचलो. दहा तासांनंतरही आमच्या १४६ बॅगा जशाच्या तशा सुरक्षित होत्या. मला याबाबत पूर्ण विश्वास होता; मात्र काही सहप्रवाशांच्या मनातील शंका आता कायमची दूर झाली.ज्यांनी माझा सल्ला न मानता स्वतःच्या बॅगा सोबतच ठेवल्या होत्या, त्यांना हमालीसाठी प्रत्येकी सुमारे ३५० रुपये खर्च करावे लागले. आमच्या व्यवस्थेचा लाभ घेतला असता हा खर्च केवळ १०० रुपयांत झाला असता. शेवटी त्यांनीही हसत-हसत मान्य केले की, “भाऊंचा अनुभव पुन्हा एकदा खरा ठरला.”
*खा. रविंद्र चव्हाण यांचे प्रेमळ सरप्राईज* सकाळी रेल्वे प्रवासात असतानाच नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण यांचा फोन आला. त्यांनी दुपारच्या जेवणासाठी आग्रह केला. मी आधीच भोजनाची व्यवस्था झाल्याचे सांगितल्यावर त्यांनी लगेच उत्तर दिले, “मग रात्रीचे जेवण माझ्याकडून.” रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर त्यांच्या वतीने सर्व यात्रेकरूंसाठी स्वादिष्ट भोजनाची पाकिटे वेळेवर आली होती. कामाच्या व्यापामुळे ते स्वतः उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र दूरध्वनीवरून त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि यात्रेच्या यशस्वी समारोपाबद्दल शुभेच्छा दिल्या.आम्ही सर्वांनी “बम बम भोले”चा जयघोष करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. भोजनानंतर रात्री अकराच्या सुमारास श्रीगंगानगर एक्सप्रेसने नांदेडच्या दिशेने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. शरीराने आम्ही परतीच्या वाटेवर होतो; पण मन अजूनही हिमालयाच्या कुशीत, बाबा बर्फानींच्या चरणीच रेंगाळत होते. (क्रमशः)
