‘मला माफ करा…’ शिक्षकाच्या स्टेटसने उलगडला शोकांतिकेपूर्वीचा संघर्ष!

दोन चिमुकल्यांसह शिक्षकाची आत्महत्या; शिक्षण विभागातील कथित मानसिक छळाच्या आरोपांनी खळबळ

नांदेड/भोकर/हदगांव/हिमायतनगर, प्रतिनिधी| ‘मित्रांनो, मला माफ करा…’ या शब्दांनी सुरू झालेल्या सोशल मीडिया स्टेटसने एका शिक्षकाच्या कुटुंबाच्या शोकांतिकेपूर्वीचा कथित संघर्ष समोर आणला आहे. हिमायतनगर तालुक्यातील पोटा (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या दोन लहान मुलांसह आमदुरा येथील गोदावरी नदीपात्रात कार घालून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शिक्षण विभागासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शिक्षक सुनील मोरे आणि त्यांच्या पत्नी दोघेही एकाच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. घटनेपूर्वी मोरे यांनी सोशल मीडिया स्टेटसमध्ये शिक्षण विभागातील काही अधिकारी व २०२३ ते २०२५ या कालावधीतील विविध चौकशा, तक्रारी आणि कथित मानसिक त्रासाचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे. या स्टेटसमुळे त्यांच्या मृत्यूमागील कारणांबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

स्टेटसमधील आरोपांची चौकशी होणार का? – शिक्षण विभागातील कथित छळामुळे आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचा दावा मोरे यांनी केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या स्टेटसमधील मजकूर, नमूद केलेली नावे, चौकशा आणि तक्रारी यांची सखोल चौकशी करण्याची मागणी शिक्षक वर्तुळातून होत आहे. दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपासानंतरच मृत्यूमागील वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे.

Oplus_16908288

मात्र, शिक्षकाने मृत्यूपूर्वी केलेल्या कथित आरोपांकडे दुर्लक्ष न करता निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. एका शिक्षकाच्या कुटुंबावर ओढवलेल्या या शोकांतिकेमागे नेमके काय दडले आहे? सोशल मीडिया स्टेटसमधील आरोप सत्य की गैरसमज? याचा तपास आता पोलिस आणि प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!