
शिंदे गटातील पदाधिकारी, सरपंच-उपसरपंचांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश; देगलूर-बिलोलीत संघटनात्मक बैठकीत पोतदारांचा एल्गार
देगलूर, गंगाधर मठवाले| शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे अंगार आणि निखाऱ्यासारखे आहेत. त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेला शिवसैनिक आजही लढण्याच्या भूमिकेत आहे. या निखाऱ्यावर केवळ फुंकर मारण्याची गरज असून शिवसेना पुन्हा धगधगेल, असा दावा नांदेड लोकसभा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी केला.


देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी हॉटेल स्वाद ओंकार रेसिडेन्सी येथे झाली. यावेळी पोतदार बोलत होते.


यावेळी शिंदे शिवसेनेतील पदाधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. नव्या कार्यकर्त्यांना पक्षात योग्य संधी आणि पदे देण्यात येतील, असे पोतदार यांनी सांगितले.



“शिवसैनिक लढणारा आहे, रडणारा नाही,” असे सांगत पोतदार यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आणि जनतेला न्याय देण्यासाठी अनेकांना मंत्रीपदे दिली; मात्र आज त्याच सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून शिवसेना फोडण्यासाठी पैसा वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.


आगामी निवडणुकांत शिवसैनिक आणि जनता योग्य उत्तर देतील, असा दावा करत पोतदार यांनी पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर भर दिला. दरम्यान, पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकारी, सरपंच व उपसरपंचांचा भगवी दस्ती व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

बैठकीला जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, सहसंपर्कप्रमुख दयाल गिरी, नांदेड महानगरप्रमुख प्रकाश मारावार, विजय मुंडकर, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, देगलूर तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, बिलोली तालुकाप्रमुख शिवकुमार बाबणे सगरोळीकर, मुखेड तालुकाप्रमुख उमेश पाटील आडलूरकर, विधानसभा मतदारसंघप्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, विधानसभा मतदारसंघ संघटक राजेंद्र इंगळे खानापुरकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच शहरप्रमुख भगवान जाधव, बाबुराव मिनकीकर, युवा सेना तालुकाप्रमुख तथा सोशल मीडिया नेटवर्क प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, शहर संघटक मष्णाजी पैलावार, कोंडलवाडी शहरप्रमुख हेंमके, उपतालुकाप्रमुख मानाजी पाटील लोणे लोणीकर, पुरुषोत्तम अन्सापुरे, विविध विभागप्रमुख, युवा सेना पदाधिकारी, अल्पसंख्याक सेनेचे तालुकाध्यक्ष इस्माईल शेख पठाण यांच्यासह सुमारे १०० प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान ठाणे येथील शिवसेना पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रगीताने बैठकीची सांगता करण्यात आली.
