
प्रवास संपला… पण नात्यांचा प्रवास अधिक दृढ झाला!



तेरा दिवसांचा सहवास आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला होता. रेल्वे महाराष्ट्राच्या दिशेने धावत होती आणि प्रत्येक स्थानकासोबत प्रवासाची सांगता जवळ येत होती. मात्र या शेवटच्या दिवसातही प्रेम, आत्मीयता आणि सेवाभावाचा वर्षाव तितक्याच ओलाव्याने होत राहिला.



पहाट सरून सकाळ झाली आणि रेल्वे भोपाळ स्थानकावर थांबली. तेथे माझे जुने स्नेही, उद्योगपती प्रदीप शुक्ला यांच्या परिवाराने पुन्हा एकदा आपुलकीची परंपरा जपली. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रतिभा शुक्ला स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह भरगच्च नाश्त्याची व्यवस्था करून स्थानकावर उपस्थित होत्या. पदार्थांची चव, मांडणी आणि प्रेमाचा स्पर्श इतका सुंदर होता की क्षणभर एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील नाश्त्याचा अनुभव घेत असल्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली.


प्रदीपजींशी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी रेल्वे प्रवासात झालेली ओळख आजही तितकीच जिवंत आहे. प्रत्येक वर्षी ते कोणत्याही आठवणीची वाट न पाहता स्वतः विचारपूस करतात—यावेळी नाश्ता आणू का जेवण? अशी माणसं नात्यांना शब्दांनी नव्हे तर कृतीने जपतात. त्यांच्या या सेवाभावाबद्दल अमरनाथ यात्री संघाच्या वतीने सौ. प्रतिभा शुक्ला यांचा सौ. जयश्री ठाकूर यांच्या हस्ते ट्रॉफी, सिरोपाव, मोत्याची माळ आणि बाबा अमरनाथांचा प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. यात्रेकरूंचा उत्साह, शिस्त आणि एकोप्याचा अनुभव घेतल्यानंतर प्रतिभादीदींनी पुढील वर्षी स्वतःही अमरनाथ यात्रेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.


यानंतर रेल्वेचा प्रवास पुढे सुरू झाला आणि प्रत्येक स्थानकावर प्रेमाची नवी भेट मिळत राहिली. खंडवा येथे स्नेहलता जायस्वाल यांनी सर्व यात्रेकरूंकरिता रुचकर भोजनाची पार्सले पाठविली होती. माझ्या अनेक सामाजिक उपक्रमांना त्या सातत्याने आर्थिक आणि नैतिक पाठबळ देत असतात. त्यांच्या या निःस्वार्थ योगदानामुळे अनेक कामांना बळ मिळाले आहे.
अकोला स्थानकावरही प्रेमाचा तोच ओलावा अनुभवायला मिळाला. संजय व छाया चौधरी यांनी सर्वांसाठी बिसलरीच्या पाण्याची व्यवस्था केली होती, तर गंगामणी गिरगांवकर यांनी चहा-कॉफीची सेवा दिली. याशिवाय अमरनाथ यात्रा वगळता आमच्या इतर सर्व सहलींमध्ये कॅटरिंगची जबाबदारी सांभाळणारे अमोल गोळे यांनी खास वऱ्हाडी पद्धतीचे पिठलं-भाकरी आणि भरीत आणले होते. अनेक दिवसांच्या उत्तर भारतातील भोजनानंतर या अस्सल मराठमोळ्या जेवणाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. अनेक यात्रेकरूंनी हसतच सांगितले की, शेवटच्या दिवशी झालेली ही आदरातिथ्याची व्यवस्था म्हणजे जणू एखाद्या वऱ्हाडी पाहुणचाराची आठवण करून देणारी होती.
अकोला ते नांदेड हा प्रवास केवळ चार तासांचा होता; पण त्या चार तासांत तेरा दिवसांचा संपूर्ण पट पुन्हा एकदा सर्वांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जपलेले फोटो, व्हिडिओ, आठवणी, विनोदी प्रसंग, भावनिक क्षण आणि दर्शनाचे दृश्य एकमेकांशी शेअर होत होते. कोण हसत होते, कोण पुन्हा त्या क्षणांत हरवून जात होते, तर कोणाच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळत होते. प्रवास संपत होता, पण मन मात्र अजूनही हिमालयातच रेंगाळत होते.
या यात्रेचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती संपूर्णपणे “ना नफा, ना तोटा” या तत्त्वावर आयोजित केली जाते. यात्रेकरूंना जेवणासाठी एक रुपयाही खर्च करावा लागू नये, यामागे अनेक अन्नदाते आणि सेवाभावी व्यक्तींचे मोठे योगदान आहे. मुख्य भोजनाची सेवा देणाऱ्यांमध्ये माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, खा. रविंद्र चव्हाण, नवनाथ सोनवणे, नागेश शेट्टी, हृदयनाथ सोनवणे, सतीश सुगनचंदजी शर्मा, सुभाष बंग, सरदार जसबीरसिंघ जागीरसिंह (अमृतसर), मनोज शर्मा (नागपूर), अमोल गोळे (अकोला), सरदार कुलदीपसिंघ (लुधियाना), शंकरराव वानेगावकर, इसाखान (किनवट), स्नेहलता जायस्वाल आणि एका शिवभक्ताचे विशेष योगदान लाभले.
एका वेळच्या अल्पोपहाराची जबाबदारी डॉ. अजयसिंह ठाकूर (पूर्णा), कार्यकारी अभियंता द्वारकादास अग्रवाल, प्रदीप शुक्ला (भोपाळ), चंद्रकांत अप्पाराव कदम, सुधीर शिवणीकर, भरत ढगे सर, अजय संगेवार, रामेश्वर वाघमारे,भगवानदास आसवा (उमरी )तसेच आमच्याच यात्रेतील छाया व संजय चौधरी, गंगाधरराव मुंगल, संजय खुपसे, नेहा व सतेज राजपूत, पूजा व अमोलसिंह चौहान, विश्राम कुंटूरकर, प्रशांत जोशी, नरसादेवी ताटपल्लेवार, अशोक दालपे, रणजीत धर्मापुरीकर, सपना अग्रवाल, साईप्रसाद हळदे, नारायणसिंह चव्हाण, राधा चव्हाण, जयंत आडे, गंगामणी गिरगांवकर आणि डॉ. गुलाब इंगोले (पूर्णा) यांनी सांभाळली. या सर्वांच्या सहकार्यामुळे यात्रेतील प्रत्येक दिवस समाधानाने पार पडला. अन्नदानातून शिल्लक राहिलेली ₹२,२०० रक्कम १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाप्रसादासाठी वापरण्याचा निर्णयही सर्वांच्या संमतीने घेण्यात आला.
रात्र झाली आणि अखेर रेल्वे नांदेड स्थानकावर दाखल झाली. घड्याळात साडेदहा वाजले होते; पण स्वागतासाठी जमलेला उत्साह पाहून वेळेचे भानच राहिले नाही. पुष्पवृष्टी, टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोष यांच्या वातावरणात यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले. अनेक ज्येष्ठ आणि कनिष्ठ कार्यकर्ते प्रेमापोटी पाया पडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी मी त्यांना एवढेच सांगितले—“ही यात्रा मी यशस्वी केली नाही. तुम्हा सर्वांनी एकमेकांची साथ दिली, शिस्त पाळली आणि सहकार्य केले म्हणूनच ती यशस्वी झाली. विजय कर्णधाराचा असू शकतो; पण यश संपूर्ण संघाचेच असते.”
त्यानंतर “किती सांगू मी सांगू कोणाला… आज आनंदी आनंद झाला…” या गीताच्या तालावर सर्व यात्रेकरूंनी एकत्र नृत्य करून या अविस्मरणीय यात्रेचा आनंदोत्सव साजरा केला. थकवा होता, पण त्याहून मोठे समाधानही होते. या प्रवासाचा शेवट करताना मनात नकळत काही ओळी उमटल्या—
सितारों को आँखों में महफूज रखना,
बड़ी देर तक रात ही रात होगी।
मुसाफिर हैं हम, मुसाफिर हो तुम भी,
किसी मोड़ पर फिर मुलाकात होगी।
शब्दांनी निरोप दिला असला तरी बाबा अमरनाथांचे दर्शन, हिमालयातील ते पवित्र क्षण आणि या यात्रेत जुळलेली माणसं आयुष्यभर मनात जपली जातील. पुढील भाग (१६) मध्ये यात्रेकरूंचे मनोगत प्रकाशित करण्यात येईल. त्यानंतरच्या १७ व १८ व्या अंतिम भागांमध्ये वाचकांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे आपली प्रतिक्रिया अवश्य पाठवा. मो. ९४२१८ ३९३३३ (क्रमशः)
