कोरोनाच्या भयछायेतून..!

कोरोना…! हे केवळ एका विषाणूचे नाव नव्हते. ते एका अशा काळाचे नाव होते, ज्याने माणसाच्या जगण्याच्या व्याख्येलाच हादरा दिला. घराच्या चार भिंती सुरक्षित वाटत होत्या आणि त्याच चार भिंती काही क्षणांत तुरुंगासारख्या भासू लागल्या. रस्ते ओस पडले होते. बाजारपेठांना कुलपे लागली होती. शाळांच्या प्रांगणात मुलांच्या किलबिलाटाऐवजी शांततेचे साम्राज्य होते. देवळांचे दरवाजे बंद होते आणि रुग्णालयांचे दरवाजे मात्र अखंड उघडे होते.

माणूस माणसाला भेटण्यास घाबरत होता. हस्तांदोलन धोकादायक झाले होते. मिठी संशयास्पद झाली होती. शेजाऱ्याचा खोकला ऐकला तरी मनात धडकी भरत होती. घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क आणि मनात असंख्य प्रश्न‘आपण सुरक्षित आहोत का?’, ‘आपल्याला कोरोना झाला तर?’, ‘आपल्या कुटुंबाचे काय होईल?’अशा असंख्य प्रश्नांनी मानवी मनाला वेढून टाकले होते.

कोरोनाने शरीरांवर आक्रमण केले; पण त्याहून भयंकर आक्रमण त्याने मानसिकतेवर केले.अनेक घटना आणि अनुभवांकडे पाहिले असता असे प्रकर्षाने जाणवत होते की, काही व्यक्तींना आजारापेक्षा आजाराच्या भयानेच अधिक ग्रासले होते. कोरोना हा रोग होता; परंतु त्याभोवती निर्माण झालेले भय जणू त्याची सावली होती. आणि ती सावली अनेकदा मूळ संकटापेक्षाही अधिक भयावह ठरत होती.

बातम्या होत्या की भयाचे संदेशवाहक? त्या काळात माहितीचे महत्त्व प्रचंड वाढले होते. पण माहिती आणि भीती यांच्यातील सीमारेषा अनेकदा पुसट झाली होती.एखाद्या शहरात मृत्यू झाला की बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वदूर पोहोचायची. एखाद्या गावात रुग्ण आढळला की संपूर्ण परिसरात चिंतेचे सावट पसरायचे. मृतांची संख्या, बाधितांची संख्या, रुग्णालयांतील परिस्थिती, ऑक्सिजनची कमतरता, औषधांची टंचाई या प्रत्येक बातमीचे पडसाद सामान्य माणसाच्या मनावर उमटत होते.बातमी सकाळी वाचली तरी तिचा परिणाम दिवसभर मनात रेंगाळायचा.कधी कधी बातमी ही माहिती देण्याऐवजी मनात भीतीचे बीज रोवते. ते बीज दिवसभराच्या चिंतेत वाढत जाते आणि अखेरीस मनुष्य आजार येण्यापूर्वीच आजाराच्या मानसिक सावलीत जगू लागतो.

कोरोनाच्या काळात हे विशेषत्वाने जाणवले या भयकाळातही माणसाने एक अद्भुत गोष्ट केली त्याने तंत्रज्ञानाला आपला नवा सहचर बनवले.बंद दरवाज्यांच्या काळात उघडलेली तंत्रज्ञानाची खिडकी
कोरोनाने माणसाला एकमेकांपासून दूर केले; पण तंत्रज्ञानाने माणसांना पुन्हा जोडण्याचे काम केले. ज्या व्यक्तीला कालपर्यंत मोबाईलवर फक्त फोन करणे, संदेश पाठवणे किंवा एखादा फोटो पाहणे एवढेच माहीत होते, तीच व्यक्ती काही दिवसांत व्हिडिओ कॉल, ऑनलाइन बैठक, डिजिटल व्यवहार, ऑनलाइन शिक्षण आणि विविध दृक्श्राव्य माध्यमांचा वापर करू लागली.

बालकांनी तंत्रज्ञान आत्मसात केले.युवकांनी तंत्रज्ञानाचा वेग वाढवला.आणि विशेष म्हणजे अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही परिस्थितीशी जुळवून घेत डिजिटल जगाची दारे उघडली.
‘तंत्रज्ञान शिकण्यासाठी वेळ नाही’ असे म्हणणाऱ्या पिढीने ‘तंत्रज्ञान शिकल्याशिवाय पर्याय नाही’ अशी भूमिका स्वीकारली.

याच काळात Zoom सारख्या दृक्श्राव्य संवादमाध्यमांचे महत्त्व अचानक अनेक पटींनी वाढले. कालपर्यंत प्रत्यक्ष भेटीत होणाऱ्या बैठका आता पडद्यावर होऊ लागल्या. वर्गखोल्या मोबाईलमध्ये आल्या. कार्यालये संगणकाच्या पडद्यावर आली. मुलांचे शिक्षक पडद्यामागून शिकवू लागले आणि अधिकारी घरातून प्रशासनाशी संवाद साधू लागले.
माणूस घरात बंदिस्त होता; पण त्याचा आवाज, चेहरा आणि विचार डिजिटल विश्वातून मुक्तपणे फिरत होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेतून उमगलेला विरोधाभास – कोरोनाच्या त्या काळातील एक प्रसंग आजही स्मरणात आहें .तत्कालीन जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी लोकांनी एकत्र येऊ नये, सामाजिक अंतर पाळावे, गर्दी टाळावी, असे आवाहन केले होते. त्या काळातील प्रशासनासाठी ही भूमिका अत्यंत स्वाभाविक आणि आवश्यक होती पण त्याच काळात प्रशासनाची भूमिका, कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजना याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.

एकीकडे—‘एकत्र येऊ नका’! आणि दुसरीकडे—पत्रकारांना एका ठिकाणी बोलावून संवाद!या विसंगतीकडे लक्ष वेधले गेले.प्रश्न उपस्थित झालालोकांनी एकत्र येऊ नये, तर प्रशासन आणि माध्यमांमध्ये संवाद कसा साधायचा?याच प्रश्नाने एका नव्या शक्यतेचे दार उघडले. भौतिक अंतर राखूनही संवाद साधता येतो का?बैठक घेता येते का?पत्रकारांशी थेट संवाद साधता येतो का?आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल का?याचे उत्तर होते—होय!झूम : अंतर मिटवणारी अदृश्य बैठकखोली

जागतिक आणि देशपातळीवरील कार्यपद्धतीशी जोडलेल्या कंपनीतील कार्याच्या अनुभवामुळे Zoomच्या सुविधांची ओळख आधीपासूनच झालेली होती. परंतु कोरोनाने या तंत्रज्ञानाची उपयुक्तता अधिक प्रकर्षाने समोर आणली.एका पडद्यावर अनेक चेहरे.प्रत्येक जण आपल्या जागी. कोणी कार्यालयात, कोणी घरी, कोणी दुसऱ्या शहरात. पण संवाद मात्र एकाच वेळी! अंतर होते; संवाद नव्हता असे नव्हते.भौतिक जवळीक नव्हती; परंतु वैचारिक जवळीक निर्माण झाली होती. यातून समन्वय साधता येतो, संपर्क कायम ठेवता येतो आणि संवाद अखंड सुरू ठेवता येतो, हे प्रशासनालाही उमगले.नंतर जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनीही या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केला. ही केवळ एका तंत्रज्ञानाची गोष्ट नव्हती. हा एका मानसिकतेतील बदलाचा क्षण होता. ‘भेटणे म्हणजे समोरासमोर बसणे’ या जुन्या संकल्पनेला ‘भेटणे म्हणजे संवाद साधणे’ असा नवा अर्थ प्राप्त झाला.

मोबाईलच्या पडद्यावरून मंत्र्यांशी थेट संवाद – पत्रकार म्हणून या नव्या डिजिटल युगाचा अनुभव घेताना अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर थेट संवाद साधण्याचा योग आला. शेतकरी, शेती, त्यांच्या समस्या आणि प्रशासनाची भूमिका या विषयांवर प्रत्यक्ष प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद घडला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी आरोग्य विभागाच्या सोयी-सुविधा, कोरोना चाचण्या आणि त्या काळातील आरोग्यव्यवस्थेच्या आव्हानांवर थेट संवाद झाला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू उद्धव भोसले यांच्या माध्यमातून कोरोना चाचण्यांविषयीची अद्ययावत माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. खंजिरीच्या तालावर सामाजिक प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांच्याशी दारूविक्रीच्या धोरणाविरोधातील भूमिका जाणून घेण्यासाठी मुलाखत घेण्याचा योग आला. कालपर्यंत अशा संवादासाठी प्रवास करावा लागायचा.वेळ द्यावा लागायचा. प्रत्यक्ष भेटीचे नियोजन करावे लागायचे.अधिकाऱ्यांच्या किंवा मंत्र्यांच्या वेळापत्रकात जागा शोधावी लागायची. पण कोरोनाने जगाला एक विचित्र, तरी विलक्षण प्रभावी पर्याय दिला. ‘तुम्ही कुठे आहात हे महत्त्वाचे नाही; तुम्ही जोडलेले आहात का, हे महत्त्वाचे आहे!’

जग जणू मोबाईलमध्ये मावले होते! कोरोनापूर्वी मोबाईल हा आपल्या हातातील एक साधन होता.कोरोनानंतर तो जणू आपल्या हातातील जग बनला.मुलांचे शिक्षण त्यात होते.व्यवसाय त्यात होता. बैठका त्यात होत्या. पत्रकार परिषद त्यात होती. मुलाखती त्यात होत्या.मित्र होते.नातेवाईक होते. अधिकारी होते.मंत्री होते.शिक्षक होते. विद्यार्थी होते.आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—माणसामाणसांतील संवाद त्यात जिवंत होता. जगाच्या एका टोकावर असलेला मनुष्य दुसऱ्या टोकावरच्या व्यक्तीशी क्षणार्धात बोलू लागला.कधी काळी पत्राला आठवडे लागत होते.नंतर फोनला काही मिनिटे लागली.मोबाईलने अंतर कमी केले.आणि Zoomसारख्या माध्यमांनी त्या अंतरालाही अर्थहीन करून टाकले.

भयाच्या काळात शिकण्याची जिद्द= कोरोना आपल्याला बरेच काही हिरावून घेऊन गेला.अनेकांचे प्राण गेले.अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.अनेक व्यवसाय कोसळले.अनेकांच्या मानसिकतेवर खोल जखमा झाल्या.पण या काळाने काही गोष्टी जन्माला घातल्या किंवा वेगाने पुढे नेल्या, त्यात तंत्रज्ञानाचा स्वीकार अग्रस्थानी आहे.ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार शिकले. पालकांनी ऑनलाइन शिक्षण समजून घेतले.शिक्षकांनी डिजिटल अध्यापन आत्मसात केले. पत्रकारांनी ऑनलाइन मुलाखतींची नवी पद्धत स्वीकारली. अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर वाढवला.व्यावसायिकांनी घरातून काम करण्याची पद्धत स्वीकारली.म्हणजेच संकटाने माणसाला थांबवले; पण त्याच वेळी माणसाच्या शिकण्याच्या क्षमतेला गती दिली.

कोरोनाने शिकवलेला सर्वांत मोठा धडा – कोरोनाचा काळ संपला. निर्बंध दूर झाले. रस्त्यांवर पुन्हा गर्दी झाली. शाळांमध्ये पुन्हा घंटा वाजू लागल्या. कार्यालयांत पुन्हा खुर्च्या भरल्या. बाजारपेठांनी पुन्हा गजबजाट अनुभवला. पण कोरोनाने दिलेला तंत्रज्ञानाचा धडा मागे गेला नाही.उलट तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला. आज ऑनलाइन बैठक ही नवलाची गोष्ट राहिलेली नाही. दूर असलेली व्यक्ती एका क्लिकवर समोर येते. शिक्षण, आरोग्य, व्यापार, प्रशासन, पत्रकारिता—सर्वच क्षेत्रांत डिजिटल संवादाने आपले स्थान निर्माण केले आहे.म्हणूनच कोरोनाकडे केवळ मृत्यू, भय आणि संकटाची कहाणी म्हणून पाहणे अपुरे ठरेल.तो एक वळणबिंदू होता.त्याने माणसाला आरशात स्वतःकडे पाहायला भाग पाडले.त्याने विचारायला लावले.

आपली खरी गरज काय आहे? – आपल्याला जवळीक हवी आहे की संवाद?आपल्याला मोठी कार्यालये हवी आहेत की प्रभावी संपर्क?आपल्याला प्रवासाची गरज आहे की तंत्रज्ञानाचा योग्य वापर? या प्रश्नांची अनेक उत्तरे कोरोनानंतरच्या जगाने शोधली. कोरोना आला तेव्हा माणूस भयभीत झाला.तो घरात गेला.दरवाजे बंद झाले.खिडक्या बंद झाल्या. रस्ते रिकामे झाले.पण एका छोट्याशा पडद्यावरून जगाचे दरवाजे उघडले.एका क्लिकने मंत्री समोर आले.दुसऱ्या क्लिकने अधिकारी.तिसऱ्या क्लिकने शिक्षक.चौथ्या क्लिकने नातेवाईक.आणि आणखी एका क्लिकने जग! कदाचित म्हणूनच कोरोनाची कहाणी केवळ मृत्यूची कहाणी नाही. ती भयातून तंत्रज्ञानाकडे, एकटेपणातून संवादाकडे आणि बंदिस्त जीवनातून नव्या डिजिटल विश्वाकडे झालेल्या मानवी प्रवासाची कहाणी आहे.

कोरोनाने माणसाला एकमेकांपासून दूर केले; पण तंत्रज्ञानाने त्याच माणसांना नव्या पद्धतीने जवळ आणले. देहांमध्ये अंतर वाढले, पण संवादांची दारे उघडली. रस्ते बंद झाले, पण माहितीचे मार्ग खुले झाले. जग घरात थांबले, पण मोबाईलच्या पडद्यावरून जग फिरत राहिले.आणि म्हणूनच त्या काळाकडे मागे वळून पाहताना एक वाक्य मनात ठसठसून उमटते. ‘कोरोनाने जग थांबवले; पण तंत्रज्ञानाने जगाला थांबू दिले नाही.’

लेखक…गोविंद मुंडकर, मोबाईल ८३२९०९५३०३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!