उपलब्ध चारा सकस करण्यासाठी ‘चारा साक्षरता अभियानास’ प्रारंभ

संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा पुढाकार; रामतीर्थ येथे प्रात्यक्षिक
नांदेड| अल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन व व्यवस्थापन करण्यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भर दिला आहे. त्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘चारा साक्षरता अभियान’ राबविण्यात येत असून, या अभियानाची सुरुवात बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे करण्यात आली.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत प्रगतिशील शेतकरी व पशुपालक गुणवंत शिवाजीराव देगलूरे यांच्या प्रक्षेत्रावर ‘निकृष्ट चारा सकस करणे’ या विषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. संभाव्य चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर करून पशुधनाला आवश्यक पोषणमूल्ययुक्त चारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

सोयाबीन व हरभरा कुटारावर युरिया-काकवी प्रक्रिया
रामतीर्थ येथे घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकात सोयाबीन व हरभरा कुटारावर युरिया आणि मोलासेस (काकवी) प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत प्रत्यक्ष दाखविण्यात आली. या प्रक्रियेमुळे उपलब्ध निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता, पाचकता आणि रुचकरता वाढविण्याच्या पद्धतीची माहिती पशुपालकांना देण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत नवीन चारा उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध चाऱ्याचे योग्य संवर्धन, साठवणूक आणि शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. याबाबतही यावेळी शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

चाऱ्याच्या शास्त्रीय व्यवस्थापनावर भर
चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याची पौष्टिकता वाढवून त्याचा प्रभावी वापर केल्यास पशुधनासाठी आवश्यक पोषणमूल्ययुक्त चारा उपलब्ध करून देता येतो. त्यामुळे पशुपालकांनी उपलब्ध चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन व संवर्धन करण्यासोबतच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार चारा प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा संदेश या प्रात्यक्षिकातून देण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘चारा साक्षरता अभियान’ अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांना उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय वापर, चारा संवर्धन, प्रक्रिया आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संभाव्य चारा टंचाईच्या काळात पशुधनाचे पोषण अबाधित ठेवण्यासाठी या अभियानातून जनजागृती आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, सहायक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!