कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू

मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोइफोडे यांची पाटबंधारे विभागासोबत तातडीची बैठक
नांदेड, प्रतिनिधी| यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात नांदेड शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू केले आहे. मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोइफोडे यांनी १ ऑक्टोबर रोजी पालिका मुख्यालयात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला.

 बैठकीस नांदेड उत्तर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी.आर. बनसोड, उपअभियंता सतीश चव्हाण, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, उपअभियंता प्रकाश कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयातील सद्यस्थितीतील ८४.६१ टक्के पाणीसाठ्याचा पुढील पावसाळ्यापर्यंत काटेकोरपणे वापर कसा करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. तसेच किवळा साठवण तलाव आणि इसापूर धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाणीसाठ्याचाही आढावा घेण्यात आला.

आगामी उन्हाळ्यात पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन महापालिका आणि पाटबंधारे विभागाने संयुक्तपणे पाणी बचत, वितरण आणि पाण्याच्या वापराचा आराखडा तयार करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. धरणे व विविध जलप्रकल्पांमधील पाणीसाठ्याचे नियमित व अचूक मोजमाप करून त्यानुसार पाणीपुरवठ्याचे रोटेशन निश्चित करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.

मुख्य जलवाहिन्यांमधील गळती तातडीने रोखणे, पाण्याचा अपव्यय थांबविणे तसेच अनधिकृत पाणी उपशावर प्रतिबंध घालणे, याबाबतही आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, संभाव्य पाणी संकटाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पिण्याचे पाणी अनावश्यक कामांसाठी वाया घालवू नये, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

आगामी काळातील पाणीपुरवठ्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महापालिका आणि पाटबंधारे विभाग सज्ज असून, उपलब्ध पाणीसाठ्यावर सातत्याने लक्ष ठेवून नियोजन केले जात असल्याचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोइफोडे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!