
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नांदेड | महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २७ सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्रातील मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली.


शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हा उपाध्यक्ष तातेराव पाटील आलेगांवकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. २५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शासनाने विविध उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी दुष्काळग्रस्तांच्या अडचणींची तीव्रता लक्षात घेता आणखी तातडीच्या उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे पक्षाने म्हटले आहे.


राज्यात दुष्काळातून वंचित राहिलेल्या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, संपूर्ण जमीन महसूल माफ करावा, तसेच विविध प्रकारच्या कृषी व शेतीपूरक कर्जांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कृषी पंपांची वीज बिले माफ करावीत आणि ई-पीक पाहणीच्या आधारे अनुदानास पात्र शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज खंडित करू नये, अशीही मागणी निवेदनात आहे.


दुष्काळग्रस्त भागात लोडशेडिंग करू नये, अशी मागणी करतानाच शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना प्रतिकुटुंब २५ किलो धान्य सवलतीच्या दरात अथवा मोफत उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये, तर शेतमजुरांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये अनुदान तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


रोजगार, पाणी आणि पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना
रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांचे जॉब कार्ड निश्चित करून त्यांच्या गावापासून तीन किलोमीटरच्या परिसरात तातडीने रोजगाराची कामे सुरू करावीत. पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या पाण्यासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व शेतमजूर कुटुंबांच्या पशुधनासाठी त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करावे. फळबागा, केळी, ऊस व अन्य पिकांच्या झालेल्या नुकसानीची तातडीने आर्थिक मदत द्यावी. मोठ्या प्रमाणावर फळबागांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन अनुदानाबाबत तातडीने आदेश काढावेत, अशी मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांनाही दिलासा देण्याची मागणी
दुष्काळग्रस्त भागातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी तसेच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची वसतिगृह व मेस फी संपूर्णपणे माफ करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये प्रलंबित असलेले ट्रॅक्टर व अन्य अनुदान तातडीने वितरित करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.
दुष्काळ निवारणासाठी आवश्यक संपूर्ण निधी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने वर्ग करावा. तसेच दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करावी आणि आवश्यक उपाययोजनांबाबत निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
दसरा-दिवाळीपूर्वी मदतीची मागणी
विशेष अधिवेशनात घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करून नुकसानग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना दसरा व दिवाळीपूर्वी आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात वर्ग करावी, अशी मागणी खा. शरदचंद्र पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
या सर्व मागण्यांची शासनाने तातडीने अंमलबजावणी करून दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकरी व शेतमजुरांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी तातेराव पाटील आलेगांवकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्या कल्पनाताई पाटील डोंगळीकर, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. मुजाहिदखान, किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण भवरे, युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष सिंधुताई देशमुख, माजी नगरसेवक प्रकाश मुराळकर, युवक शहर जिल्हाध्यक्ष मनबीरसिंघ, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नाना पोहरे, युनूसखान, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मारोती चिवळीकर, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष गंगाधर महाजन, शिख सेलचे तरविंदरसिंघ बडगुजरा, ज्योती जीवन गोवंदे, डॉ. केशवराव तोडे, राजू लोखंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
