
नांदेड /हदगांव /हिमायतनगर,अनिल मादसवार| हदगाव आणि हिमायतनगर या दोन्ही तालुक्यांचा समावेश प्रस्तावित किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात न करता, त्यांना पूर्वीप्रमाणेच नांदेड अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी कायम जोडून ठेवण्यात यावे, अशी ठाम मागणी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात आमदार कोहळीकर यांनी स्पष्ट केले की, हदगाव व हिमायतनगर या तालुक्यांचे प्रशासकीय, भौगोलिक, शैक्षणिक, वैद्यकीय, व्यापारी आणि सामाजिक संबंध अनेक दशकांपासून नांदेडशी घट्ट जोडलेले आहेत. त्यामुळे या तालुक्यांना किनवटशी जोडण्याचा निर्णय नागरिकांच्या हिताचा नसून त्यांना मोठ्या गैरसोयीचा ठरेल.


हदगाव ते किनवट हे अंतर सुमारे १०० ते १२० किलोमीटर, तर काही गावांमधून १४० किलोमीटरहून अधिक आहे. याउलट नांदेड हे तुलनेने जवळ असल्याने नागरिकांना शासकीय कामांसाठी कमी वेळ, कमी खर्च आणि सुलभ प्रवासाचा लाभ मिळतो. हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांनाही नांदेडशी दळणवळण अधिक सोयीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ मुळे नांदेडशी दळणवळण सुलभ झाले असून सार्वजनिक व खासगी वाहतुकीची मुबलक सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे महसूल, न्यायालयीन व इतर प्रशासकीय कामांसाठी नागरिकांची पहिली पसंती नांदेडलाच असते.


शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही नांदेड हेच दोन्ही तालुक्यांचे प्रमुख केंद्र असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आरोग्य सुविधा, व्यापारी व्यवहार आणि शासकीय कार्यालयांसाठी हजारो नागरिक दररोज नांदेडवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत प्रशासकीय पुनर्रचनेच्या नावाखाली नागरिकांवर अतिरिक्त प्रवास, खर्च आणि वेळेचा बोजा टाकणे योग्य ठरणार नसल्याचे आमदार कोहळीकर यांनी म्हटले आहे.
किनवट तालुक्याच्या प्रशासकीय सोयीसाठी हदगाव व हिमायतनगरमधील लाखो नागरिकांना अडचणीत आणणारा कोणताही निर्णय घेऊ नये. अन्यथा या भागात तीव्र जनक्षोभ निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी शासनाला दिला आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी सभापती बालासाहेब कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील बाभळीकर, कृ. ऊ. बा. समितीचे सभापती गंगाधर पाटील चाभरेकर, नगरसेवक गोपालभाऊ सारडा, बबनराव कदम, शेखर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाराव लांडगे, सूर्यकांत हनवते, सुदर्शन पाटील मनूलेकर, नामदेव वाकोडे, जगदीप जाधव, विनोद शिंदे, भाऊसाहेब देशमुख, शिवकुमार सोळंके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
