
विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांऐवजी उघड्यावर बसण्याची वेळ; नवीन सुसज्ज इमारतीची ग्रामस्थांची मागणी
देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील शहापूर येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेच्या तब्बल १७ वर्गखोल्यांना पावसामुळे गळती लागल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. वर्गखोल्यांमध्ये पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसून शिक्षण घेणे कठीण झाले असून, काही वेळा उघड्यावर बसून धडे गिरवण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.



शहापूर परिसरातील ग्रामीण भागात मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेची इमारत पावसाळ्यात विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्गखोल्यांच्या छताला गळती लागल्याने शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.




पालकांकडून शिक्षणासाठी मोठा संघर्ष – आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी ग्रामीण भागातील सर्वसामान्य पालक मोठा आर्थिक व मानसिक संघर्ष करीत आहेत. अनेक पालक मोलमजुरी, शेती तसेच विविध ठिकाणी नोकरी करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत आहेत. मात्र शासकीय शाळेच्या इमारतीचीच अवस्था अशी असेल तर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचे वातावरण कसे मिळणार, असा सवाल पालक व ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
खासगी शाळांमध्ये मोठ्या इमारती, विविध सुविधा आणि चांगल्या शैक्षणिक वातावरणामुळे अनेक पालक आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्याकडे वळतात. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमध्येही दर्जेदार शिक्षणाबरोबरच सुरक्षित व सुसज्ज पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.


नवीन इमारतीची तातडीने मागणी – शाळेच्या १७ वर्गखोल्यांना गळती लागल्याने संबंधित शिक्षण विभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून परिस्थितीची दखल घ्यावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळेसाठी नवीन, सुसज्ज व पावसाळ्यात सुरक्षित अशी इमारत मंजूर करून बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी शहापूर ग्रामस्थ व पालकांनी केली आहे.
शासनाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांना चांगले शिक्षणाचे वातावरण मिळेल आणि पालकांचा खासगी शाळांकडे वाढता कल कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


