शहापूर–हिप्परगा मार्गे नांदेड बससेवेला प्रारंभ

खासदार अजित गोपछडे, आमदार जितेश अंतापूरकर यांच्या पाठपुराव्याला यश; शहापूरकरांची गैरसोय दूर होणार

देगलूर, गंगाधर मठवाले | देगलूर तालुक्यातील महत्त्वाची उपबाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या शहापूर गावाला नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही समस्या खासदार डॉ. अजित गोपछडे व आमदार जितेश अंतापूरकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर देगलूर आगाराच्या वतीने नांदेड–नरसी–आदमपूर–खतगाव–हिप्परगा–शेवाळा–आलूर मार्गे शहापूर येथे मुक्कामी बससेवा सुरू करण्यात आली आहे.

या बससेवेचा प्रारंभ आमदार जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून सेवेला सुरुवात केली. तसेच बसचे चालक व वाहक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

शहापूर व परिसरातील जवळपास १५ ते २० गावांचा संपर्क शहापूरशी असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी तसेच नागरिकांना शासकीय कामे, आरोग्यसेवा, व्यापारी व्यवहार आणि इतर कामांसाठी नांदेडला जावे लागते. मात्र थेट बससेवा नसल्याने नागरिकांना प्रथम सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या देगलूरला जाऊन तेथून नांदेड गाठावे लागत होते. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होते.

व्यापारी वर्गालाही या वाहतूक सुविधेअभावी मोठा आर्थिक फटका बसत होता. नांदेड येथून माल खरेदी केल्यानंतर तो देगलूरमार्गे शहापूरला आणताना अतिरिक्त वाहतूक खर्च करावा लागत होता. त्यामुळे थेट नांदेड–शहापूर बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. बससेवा सुरू झाल्याबद्दल शहापूर व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, खासदार अजित गोपछडे व आमदार जितेश अंतापूरकर यांचे आभार मानले आहेत.

धर्माबाद बससेवेची मागणी अद्याप प्रलंबित – दरम्यान, शहापूरवासीयांनी देगलूर आगार प्रमुखांकडे देगलूर–शहापूर मार्गे धर्माबाद बससेवा सुरू करण्याची मागणी यापूर्वी अनेकदा केली आहे. मात्र वारंवार विनंती करूनही या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतरच बससेवा सुरू होत असेल, तर आगार प्रशासनाला जनतेच्या मागण्या ऐकू येत नाहीत का? असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. धर्माबाद बससेवाही लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बससेवा प्रारंभप्रसंगी देगलूर आगार प्रमुख आकुलवार शिवाजी, कनकटे, गगारेडी, कोटगिरे, मलरेड्डी, यालावार, चितलवार गणेश, चामावार जयपाल, कनकटे यांच्यासह शहापूर गावातील नागरिक, भजनी मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!