
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. वंदे मातरम् गीतानंतर आमदार जितेश अंतापूरकर व उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.



यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या वतीने ध्वजाला मानवंदना देत सलामी देण्यात आली. यावेळी महसूल, पोलीस व विविध शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच देगलूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव पडवळ, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, मुख्याधिकारी नीलम कांबळे, नायब तहसीलदार सरकलवाड गिरीश, गणेश रायेवार, बीईओ बालाजी गोडाजी, हामिद दौलताबादी, तलाठी रातोळीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सौ. सृष्टी अनुप पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती.



स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एनडीसी बँकेच्या कर्जदारांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवकुमार पाटील, नागनाथ लगडे, स्वामी सर यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते.



दरम्यान, ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूल अँड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लाठी-काठी व तलवारबाजीचे शौर्य प्रदर्शन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत निर्माण झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील जाधव यांनी केले. देशभक्तीपर वातावरण, विद्यार्थ्यांचे शौर्य प्रदर्शन आणि विविध उपक्रमांमुळे देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयातील स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात व संस्मरणीय ठरला.
