
नांदेडमध्ये तृतीयपंथीयांसाठी तीन एकर जागा; खासदार निधीतून ३० लाखांची तरतूद — सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवात चर्चासत्र व जनजागृती
नांदेड | तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. नांदेड शहरात तृतीयपंथीयांच्या विकासासाठी तीन एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, खासदार निधीतून ३० लाख रुपयांचा निधीही उपलब्ध झाला आहे. भविष्यात विकासासाठी आवश्यक असलेला निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.



सप्तरंग सेवाभावी संस्था, जिल्हा प्रशासन नांदेड आणि विशेष सहाय्यक, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव २०२६’च्या दुसऱ्या दिवशी कुसुम सभागृह, नांदेड येथे तृतीय पंथीयांच्या प्रश्नांवर चर्चासत्र, जनजागृती आणि रोजगाराच्या संधींबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री अतुल सावे बोलत होते.



तृतीयपंथीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रांत ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे आणि त्यांच्या कौशल्याला रोजगाराची जोड मिळावी, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.



कार्यक्रमाला खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, भाजप प्रदेशाध्यक्ष संजय कोडगे, भाजप उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख डॉ. सचिन पाटील उमरेकर, मीन गिरे आदी मान्यवर उपस्थित होते.


विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
सप्तरंग महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. डॉ. आज हंसराज वैद्य यांना सप्तरंग लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार, डॉ. नितीन जोशी यांना सप्तरंग आरोग्य भूषण पुरस्कार, अॅड. दिलीपसिंग ठाकूर यांना सप्तरंग सोशल आयकॉन पुरस्कार, तर मनीष बियाणी व बॉस स्वास्थ्य सेवा समिती यांना सप्तरंग समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राधे राधे प्रभात फेरी ग्रुप यांना सप्तरंग धर्मजागृती पुरस्कार, तर श्रीमती काजल नायक, जालना आणि फरीदा बक्षगुरू माय यांना किन्नर अस्मिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रा. डॉ. ओमप्रकाश दरक आणि प्रा. डॉ. अश्विनी चौधरी यांनी केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी, संस्थेचे सचिव अक्षय लक्ष्मणराव कदम, उपाध्यक्ष अब्दुल नईम खान, सहसचिव गणेश चांडोळकर, डॉ. बालाजी पेनुरकर, प्रा. डॉ. ओमप्रकाश दरक, प्रा. डॉ. लक्ष्मी पुराणशेट्टीवार, कविता जोशी, परीक्षक तमन्ना नायर (मुंबई), परीक्षक कुशल भट्टाचार्य (कोलकाता), प्रमोद देशपांडे, डॉ. उज्वला सदावर्ते, हरीश लालवानी यांच्यासह युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
युवा समितीमध्ये विनायक कदम, अजिंक्य धर्माधिकारी, राजेश्री जोशी, पद्मजा बुलबुले, देवयानी जोशी, शुभम होवाळ, अक्षय नरवाडे, हरीश काळे, यशोदीप वाठोरे, शुभम भारतीय, साक्षी मणियार, प्राची गुरव, शिवानी ओझा, मंगेश महाराज, लखन वापराणी, ज्योती पाटील आदींचा सहभाग होता. तृतीयपंथीयांच्या विकासासाठी जागा, निधी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे नांदेडमध्ये तृतीयपंथीय समाजाच्या विकासाच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडल्याचे मानले जात आहे.
