
२२ वी राज्यस्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न; राज्यभरातील २७० खेळाडूंचा सहभाग
नांदेड, प्रतिनिधी| महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अंतर्गत नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजित २२ व्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढती उत्साहात पार पडल्या. यंदाच्या स्पर्धेत ठाणे, मुंबई आणि पुणे येथील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत मैदान गाजविले. विजेत्या खेळाडूंना नांदेडच्या महापौर सौ. कविता मुळे यांच्या हस्ते रोख रक्कम, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.



स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे सलग २२ वर्षांपासून या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सलग २२ वर्षे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणारी देशातील पहिली जिल्हा बॅडमिंटन संघटना म्हणून नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेचा गौरव होत आहे.



या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. राज्यभरातून तब्बल २७० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. विविध गटांतील सामने अत्यंत चुरशीचे आणि अटीतटीचे झाले.


अंतिम सामन्यांत रंगली चुरस
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या सवेश यादव याने पुण्याच्या ऋषभ देशपांडे याच्यावर १५-९, १५-१० अशी मात करत अजिंक्यपद पटकावले. महिला दुहेरीत ऋचा सावंत आणि सिया सिंह (पुणे/ठाणे) या जोडीने अनघा करडीकर आणि नेहल गोसावी (नागपूर/ठाणे) यांच्यावर १५-११, १५-१० असा विजय मिळविला. मुलींच्या एकेरीत पुण्याच्या श्रुती मुंदडा हिने पुण्याच्याच साद धर्माधिकारी हिच्यावर १५-१४, १५-१० अशी मात करत विजेतेपद मिळविले.


मुलांच्या दुहेरीत विप्लव कुळवे आणि विराज कुळवे या ग्रेटर मुंबईच्या बंधूंनी ठाण्याच्या अर्जुन बीरजादार आणि अयान बीरजादार या बंधूंवर ९-१५, १५-१२ असा विजय मिळविला.
मिश्र दुहेरीत अमन फारोख सामीय आणि अनागत करडीकर (ठाणे) यांनी सवेश यादव व नेहल गोसावी (ठाणे) यांच्यावर १५-७, १५-८ अशी मात करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभास नांदेडच्या महापौर सौ. कविता मुळे, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सॉलेक्ट्रर रेड्डी, मुख्य पंच पारिजात नातू, सचिव महेश वाकरडकर, उपाध्यक्ष बी. के. मोहन आणि सहसचिव मोहन गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
सलग २२ वर्षांची परंपरा कायम राखत पुढील वर्षीची स्पर्धा यापेक्षा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा संकल्प आयोजकांनी यावेळी व्यक्त केला. राज्यभरातील खेळाडूंना नांदेडमध्ये दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या संघटनेच्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक करण्यात आले.
