
मानव विकास बस सेवा बंद करण्याचा इशारा; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाविरोधात संताप
हिमायतनगर | हिमायतनगर-आयटीया-सिरंजनी मुख्य रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या धोकादायक रस्त्यामुळे सिरंजनी, एकंबा, कौठा व सेलोडा येथील सुमारे १०० विद्यार्थ्यांना ने-आण करणारी मानव विकास बस सेवा बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा बस वाहतूक नियंत्रक दत्तात्रय दळवे यांनी दिला आहे.


आयटीया ते सिरंजनी या मार्गावर पावसामुळे मोठे भगदाड पडले असून बसचालकाच्या सतर्कतेमुळे नुकताच मोठा अनर्थ टळला. बस खोल खड्ड्यात जाण्याच्या स्थितीत असतानाही चालकाने प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवले. मात्र, याच रस्त्यावर यापूर्वीही अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप ठोस दुरुस्ती न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.



दररोज ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी हिमायतनगर येथे शिक्षणासाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करून बस चालविणे शक्य नसल्याचे बस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ व बस प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याबरोबरच मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली आहे.


