
पत्रकार अनिल मादसवार यांच्या शेतातील कोठ्यात दबा धरून बसलेल्या घोरपडीची सुरक्षित सुटका


हिमायतनगर | हिमायतनगर शहरालगतच्या पळसपूर रोडवरील शेतात दुर्मिळ घोरपड आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. पत्रकार अनिल मादसवार यांच्या शेतातील खत-बियाणे ठेवलेल्या कोठ्यात दबा धरून बसलेली घोरपड पाहताच त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे घोरपडीची सुखरूप सुटका करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.


नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतातील भडोळ्या बुजल्याने सरपटणारे प्राणी शेतीच्या आखाड्यात व कोठारांमध्ये आश्रय घेत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.



सोमवारी सकाळी गट क्रमांक ३ मधील शेतात पेरणीच्या तयारीत शेतकरी होते. बी बियाणे, खत काढल्यानंतर कोठ्यात दुर्मिळ घोरपड आढळून आली. याची माहिती मिळताच वनपाल ज्ञानेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनमजूर शेख अहमद व सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोणतीही इजा न होता अत्यंत शिताफीने घोरपड पकडून सुरक्षितपणे वनक्षेत्रात मुक्त करण्यात आले.



वनविभागाच्या माहितीनुसार, ही घोरपड विटकरी-काळ्या पट्टेदार रंगाची असून तिची लांबी सुमारे दीड फूट, रुंदी तीन इंच आणि वजन अंदाजे पाऊण ते एक किलो आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, घोरपड ही शेतीसाठी उपयुक्त वन्यजीव असून ती उंदीर, कीटक आणि इतर लहान जीवांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, घोरपड किंवा इतर कोणताही वन्यजीव आढळल्यास त्याला इजा न करता त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा. घोरपडीची सुरक्षित सुटका केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी वनविभागाच्या तत्परतेचे कौतुक केले असून, वन्यजीव संवर्धनासाठी नागरिकांनीही अशाच प्रकारची जागरूकता दाखवावी, असे मत व्यक्त होत आहे.
