बहादरपुराच्या पेठकर कुटुंबाचे देशभर कौतुक; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींकडून विशेष उल्लेख

लग्नातील ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून ३,५०० गावकऱ्यांना एक लाखांचा अपघाती विमा; नांदेडच्या सामाजिक उपक्रमाची देशभर चर्चा
नांदेड | कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील पेठकर कुटुंबाच्या समाजोपयोगी उपक्रमाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. विवाहसोहळ्यात पाहुण्यांना पारंपरिक भेटवस्तू देण्याऐवजी गावातील सुमारे साडेतीन हजार नागरिकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघाती विमा भेट देण्याचा अभिनव निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमातून पेठकर कुटुंबाचे कौतुक केले.

सिद्धेश्वर पेठकर यांच्या विवाहानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बहादरपुरा गावाची ओळख देशभर पोहोचली आहे. आपल्या मनोगतात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात लग्न किंवा कौटुंबिक समारंभ हे केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाचा उत्सव असतो. अशा आनंदाच्या क्षणी कठीण काळात उपयोगी पडणारी भेट देण्याचा पेठकर कुटुंबाचा विचार प्रेरणादायी असून, अपघाताच्या प्रसंगी हा विमा अनेक कुटुंबांना मोठा आधार ठरेल.

या उल्लेखानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी नवरदेव सिद्धेश्वर पेठकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत अभिनंदन केले. “पंतप्रधानांनी तुमच्या कुटुंबाच्या उपक्रमाचा उल्लेख करणे ही नांदेड जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.

समाजहिताचा संदेश देणाऱ्या या अभिनव उपक्रमामुळे बहादरपुरा गावासह संपूर्ण नांदेड जिल्ह्याची मान देशपातळीवर उंचावली असून, पेठकर कुटुंबावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!