सिमेंटच्या जंगलात हरवत चालले नांदेडचे ‘वसंतराव नाईक उद्यान’!

विकासाच्या घोषणांत हिरवाईचा बळी; झाडे तहानलेली, प्रशासन मात्र आश्वासनांत रमलेले

नांदेड,गोविंद मुंडकर| एकेकाळी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” अशी संस्कृती जपणाऱ्या महाराष्ट्रात आता “सिमेंटवल्ली आम्हा विकासचरे” अशी नवी परंपरा सुरू झाली की काय, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती नांदेडमध्ये निर्माण झाली आहे. कारण शहरातील नागरिकांचा श्वास मानले जाणारे वसंतराव नाईक उद्यान आज स्वतःच श्वासासाठी धडपडत आहे.

नागरिकांच्या आरोग्याचे, पर्यावरणाचे आणि भावी पिढ्यांच्या हरित भवितव्याचे स्वप्न पाहत वसंतराव नाईक सोसायटीने ही प्रशस्त जागा उद्यानाच्या संरक्षण व विकासासाठी महानगरपालिकेकडे सुपूर्द केली होती. मात्र संरक्षण झाले की उपेक्षा, हा प्रश्न आज या उद्यानात पाऊल ठेवताच पडतो.

स्वातंत्र्य सैनिक नगर, शोभा नगर, वसंतराव नाईक नगर परिसरातील हजारो नागरिक रोज सकाळ-संध्याकाळ येथे फिरण्यासाठी येतात. पण त्यांचे स्वागत हिरव्यागार वृक्षांनी नव्हे, तर तहानलेल्या झाडांनी आणि कोरड्या मातीने होत आहे.

उद्यानात विंधन विहीर (बोअरवेल) आहे. पाणीही आहे. मात्र ते झाडांपर्यंत पोहोचविण्यासाठी माणूस नाही. त्यामुळे “पाणी असून तहान” अशी या उद्यानाची शोकांतिका झाली आहे. जणू प्रशासनाने झाडांनाच “आत्मनिर्भर” होण्याचा सल्ला दिला आहे!

कोट्यवधी रुपयांची सिमेंट काँक्रीटची कामे झपाट्याने सुरू आहेत; पण लाखो रुपयांचे प्राणवायू देणाऱ्या झाडांना काही बादल्या पाणी मिळावे, एवढीही संवेदनशीलता प्रशासनाकडे नसावी, ही खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

विशेष म्हणजे हे उद्यान अनेक मान्यवर लोकप्रतिनिधींच्या परिचयातील परिसरात आहे. निवडणुकांच्या काळात नागरिकांच्या भेटीगाठींसाठी सहज गाठले जाणारे हे ठिकाण, निवडणुका संपल्यानंतर मात्र हिरवाईसह विस्मृतीत गेले की काय, अशी चर्चा नागरिकांत रंगू लागली आहे.

उद्यान म्हणजे शहराचे फुफ्फुस असते. पण येथेच फुफ्फुसाला ऑक्सिजन मिळत नसल्याचे चित्र आहे. विकासाच्या नावाखाली शहर सिमेंटचे होत असताना, झाडांच्या मुळाशी पाणी पोहोचत नाही; ही केवळ प्रशासनाची चूक नाही, तर पर्यावरणाविषयीच्या धोरणात्मक उदासीनतेचे जिवंत उदाहरण आहे.

यासंदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता, त्यांनी उद्यानाची पाहणी करून ज्येष्ठ नागरिक व संबंधित प्रभागातील लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

नागरिकांची अपेक्षा मात्र स्पष्ट असून, आता बैठका नव्हे, बादल्या हव्यात; आश्वासने नव्हे, पाणी हवे; कागदावरील विकास नव्हे, हिरवाईचा विकास हवा. अन्यथा “हरित नांदेड” ही घोषणा फलकांपुरतीच राहील आणि भविष्यात मुलांना उद्यानातील झाडे पुस्तकातच दाखवावी लागतील.

स्वच्छतागृहाशिवाय उद्यान कसे? उद्यानात दररोज ज्येष्ठ नागरिक, महिला, मधुमेही रुग्ण आणि लहान मुले मोठ्या संख्येने येतात. मात्र येथे मुतारी किंवा स्वच्छतागृहाची कोणतीही व्यवस्था नाही. तसेच कायमस्वरूपी माळी किंवा चौकीदार नेमल्यास उद्यानाचे व्यवस्थापन आणि संवर्धन अधिक प्रभावी होईल. — श्रीराम पिंपळगावकर, निवृत्त जिल्हा व्यवस्थापक, भूविकास बँक, नांदेड.

‘छोटे गेट’ की दारुड्यांची चोरवाट? उद्यानाला चौकीदार नसल्याने काही काळ दारुड्यांचा मुक्त वावर वाढला होता. विमानतळ पोलिसांच्या मदतीने त्यावर नियंत्रण आले. मात्र आता मागील बाजूस उभारण्यात आलेल्या नव्या छोट्या गेटमुळे पुन्हा दारुड्यांना पळून जाण्याची चोरवाट उपलब्ध झाली आहे. याचबरोबर वडाच्या झाडाखालील मंदिराच्या पावित्र्यावरही परिणाम होत असल्याची तक्रार आहे. हे छोटे गेट त्वरित बंद करावे, अशी मागणी महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. — डॉ. शिवदास हमंद, निवृत्त प्राध्यापक, नांदेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!