30 जूनपासून मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; प्रत्येक पात्र मतदाराने EF फॉर्म भरण्याचे आवाहन

बिलोली, गोविंद मुंडकर| भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रत्येक पात्र मतदाराने सक्रिय सहभाग घेऊन Enumeration Form (EF) वेळेत भरून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या अभियानाअंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घराघरात जाऊन मतदारांकडून EF फॉर्म भरून घेणार आहेत. प्रत्येक मतदाराने दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तयार ठेवावेत. फॉर्मवर संबंधित मतदाराने किंवा कुटुंबातील प्रौढ सदस्याने स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा देणे आवश्यक राहील. फॉर्मची एक प्रत मतदाराकडे राहणार असून दुसरी प्रत BLO यांच्याकडे जमा केली जाईल.

40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मतदारांनी सन 2002 च्या मतदार यादीतील स्वतःचा भाग क्रमांक व अनुक्रमांक सांगावा. तर 40 वर्षांखालील मतदारांनी आई, वडील, आजी किंवा आजोबा यांपैकी कोणत्याही एका व्यक्तीचा सन 2002 च्या मतदार यादीतील भाग क्रमांक व अनुक्रमांक नमूद करावा. यासंदर्भातील आवश्यक माहिती BLO यांच्याकडे उपलब्ध राहणार आहे.

प्रशासनाने विवाहित महिलांना माहेरच्या कुटुंबातील माहितीची पडताळणी करून योग्य तपशील देण्याचे आवाहन केले आहे. तसेच बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या मतदारांनी आपले दोन पासपोर्ट आकाराचे फोटो व आवश्यक माहिती आपल्या कुटुंबीयांकडे आधीच उपलब्ध करून द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

प्रशासनाच्या सूचनेनुसार, EF फॉर्म भरून BLO यांच्याकडे जमा करणाऱ्या मतदारांचीच नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही यासाठी प्रत्येकाने वेळेत फॉर्म भरून सहकार्य करणे आवश्यक आहे.

“आपला सहभाग – आपला मतदानाचा हक्क सुरक्षित” या संदेशासह सर्व नागरिकांनी या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सहभागी होऊन निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन क्रांती डोंबे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!