इंदिरानगर सरसम आशा स्वयंसेविका नियुक्तीचा प्रस्ताव पाच महिन्यांपासून रखडला; ३० जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील इंदिरानगर (सरसम) येथील आशा स्वयंसेविका नियुक्तीचा प्रस्ताव तयार असूनही तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यास गेल्या पाच महिन्यांपासून विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संबंधित उमेदवाराने ३० जूनपासून प्राथमिक आरोग्य केंद्र, सरसम येथे कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

माहितीनुसार, यापूर्वी इंदिरानगर सरसम येथील आशा स्वयंसेविका निवड प्रक्रियेत अपात्र उमेदवाराची निवड झाल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. यानंतर पात्र असूनही निवडीपासून वंचित राहिलेल्या रेखा कोंडबा कवडे यांनी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती. या प्रकरणी त्यांनी दोन वर्षांत तीन वेळा कुटुंबासह आमरण उपोषणही केले होते.

त्यानंतर २२ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून वडगाव, पवना आणि इंदिरानगर (सरसम) या तीन प्रलंबित गावांतील आशा स्वयंसेविका निवड जुन्या प्रक्रियेनुसार पात्र व सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारांमधून करण्याचे निर्देश दिले होते.

या आदेशानुसार पवना आणि वडगाव येथील पात्र उमेदवारांचे प्रस्ताव सादर होऊन त्यांची नियुक्तीही करण्यात आली. मात्र, इंदिरानगर सरसम येथील पात्र उमेदवाराचा प्रस्ताव समितीने तयार करून स्वाक्षऱ्या झाल्यानंतरही तो अद्याप वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, हिमायतनगर तालुक्यात लवकरच ४३ आशा स्वयंसेविकांची नवीन भरती होणार असल्याची माहिती समोर आली असून, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक, हिमायतनगर यांना निवेदन देण्यात आले असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

(टीप : प्रस्ताव रखडल्याचा आरोप संबंधित उमेदवाराने केला असून, याबाबत संबंधित आरोग्य विभागाची अधिकृत भूमिका अद्याप प्राप्त झालेली नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!