
नांदेड | मराठवाड्यात यंदा भरपूर पाऊस पडावा, जलसाठे भरावेत, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे तसेच अमरनाथ यात्रा निर्विघ्न व यशस्वी पार पडावी, या उद्देशाने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २७ वी रत्नेश्वरी पाऊस दिंडी रविवारी (दि. २८ जून) सकाळी ६ वाजता जी. जी. रोडवरील बालाजी मंदिर येथून उत्साहात प्रस्थान करणार आहे.


अमरनाथ यात्री संघ, भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर आणि लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार अमरनाथ राजूरकर, संजय कोडगे, ॲड. चैतन्य देशमुख, डी. पी. सावंत, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंह गाडीवाले, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे तसेच इतर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे.


ढोल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या दिंडीचे विविध ठिकाणी सामाजिक संस्था व नागरिकांकडून स्वागत करण्यात येणार आहे. मार्गावरील विविध ठिकाणी चहा, नाश्ता, अल्पोपहार, भोजन, पिण्याचे पाणी, उसाचा रस आदी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.


यंदाच्या दिंडीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश. नांदेड ते रत्नेश्वरी गड या मार्गावर सहभागी भाविक जांभूळ, सीताफळ, लिंबोळी, आंबा, करंज, बाभूळ आदी वृक्षांच्या हजारो बिया पेरणार असून विद्यार्थ्यांनी तयार केलेले शेकडो सीड बॉल जंगल परिसर व डोंगरमाथ्यावर टाकण्यात येणार आहेत. दिनेश मोरताळे यांच्या सौजन्याने सीड बॉलचे वितरण केले जाणार आहे.


गेल्या २६ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे नांदेड-रत्नेश्वरी मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धन झाले असून अनेक झाडे आजही या उपक्रमाची साक्ष देत आहेत.
रत्नेश्वरी गडावर सामूहिक आरती करून मराठवाड्यात चांगला पाऊस, शेतकऱ्यांचे सुख-समृद्ध जीवन, पर्यावरण संरक्षण तसेच अमरनाथ यात्रेच्या यशासाठी रत्नेश्वरी मातेला साकडे घालण्यात येणार आहे.
धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी नांदेडकरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत, “एक यात्रेकरू – एक बीज, एक सीड बॉल आणि एक झाड” हा संकल्प स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या २७ व्या रत्नेश्वरी पाऊस दिंडीबाबत नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
