
माहूर/नांदेड | माहूर तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या वझरा शेख फरीद गावात दारूबंदीच्या मागणीने जोर धरला असून, गावातील महिलांसह नागरिकांनी दारू विक्री केंद्रे बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दारू दुकाने सुरू करण्यासाठी देण्यात आलेल्या नाहरकत प्रमाणपत्रासह विविध प्रक्रियांबाबत चौकशी करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.


सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात दोन बार अँड रेस्टॉरंट, एक बिअर शॉपी तसेच मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू विक्री होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता पालक व्यक्त करत आहेत.


गावात प्रसिद्ध शेख फरीद दर्गा असल्याने विविध धर्मीय भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. त्यामुळे गावातील सामाजिक व धार्मिक वातावरणावर दारू विक्रीचा विपरीत परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


दारू विक्री केंद्रांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाने देण्यात आले असले तरी, परवाना प्रक्रियेदरम्यान ग्रामसभा, ग्रामपंचायतीचा ठराव किंवा नाहरकत प्रमाणपत्र कशा प्रकारे मिळाले, याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच काही इमारतींना बांधकाम परवानगी, खाद्य व्यवसायासाठी आवश्यक परवाने आणि दुकान नोंदणी नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आरोपांबाबत संबंधित विभागांनी अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.


गेल्या दीड-दोन महिन्यांपासून गावात दारूबंदीसाठी हालचाली सुरू असून, महिलांसह अनेक नागरिक या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गावातील राजकीय घडामोडींमुळे या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, भविष्यात यावरून ग्रामपंचायत निवडणुकीतही वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गावातील ज्येष्ठ नागरिकांनी दारूबंदीची मागणी करत प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आता उत्पादन शुल्क विभाग व संबंधित प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेतात, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
