स्टॉप डायरिया अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ; जलजन्य आजार रोखण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन

नांदेड | पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डायरिया व अन्य जलजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने ‘स्टॉप डायरिया अभियान’ या विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींनी शुद्ध पाणीपुरवठा, पाणी गुणवत्तेची नियमित तपासणी आणि गावांमध्ये स्वच्छता राखण्यावर विशेष भर द्यावा, असे आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड यांनी केले.

यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. बी. एन. संगनवार तसेच जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार कपेंद्र देसाई उपस्थित होते.

‘स्वच्छ जल, समुचित स्वच्छता – डायरियापासून बचावाची खात्री’ या ब्रीदवाक्याखाली १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), आरोग्य पर्यवेक्षक, उपअभियंते, कनिष्ठ अभियंते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच तालुका स्तरावरील समन्वयकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

अभियान तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात गावातील पाणीपुरवठा योजनांची पाहणी, पाईपलाईन गळती दुरुस्ती, ग्रामसभा व जनजागृती, पाणी गुणवत्ता तपासणी, गृहभेटी तसेच वैयक्तिक स्वच्छता आणि साबणाने हात धुण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, पाणी स्रोतांची तपासणी, घरगुती नळजोडण्यांची पाहणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, मैलागाळ व्यवस्थापन तसेच हागणदारीमुक्त व शाश्वत स्वच्छ गाव संकल्पना बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

कार्यक्रमात जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार कपेंद्र देसाई यांनी अभियानाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांची सविस्तर माहिती दिली. पावसाळ्यात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायती, आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!