गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यापीठाचा कठोर निर्णय स्वागतार्ह – प्रा. डॉ. नितेशकुमार घुंगरवार

नांदेड | उच्च शिक्षणातील गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले कठोर निर्णय समाजहिताचे असून, विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालयाची निवड करताना अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे मत प्रा. डॉ. नितेशकुमार घुंगरवार यांनी व्यक्त केले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने काही महाविद्यालयांतील बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याचा घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि शिक्षणातील गुणवत्ता जपणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रा. घुंगरवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, काही शिक्षण संस्थांमध्ये आवश्यक प्रयोगशाळा, पात्र प्राध्यापक, ग्रंथालय सुविधा आणि दर्जेदार अध्यापनाचा अभाव असूनही विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जाते. परिणामी अनेक विद्यार्थी पदवीधर होतात; मात्र त्यांच्याकडे आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि रोजगारक्षमतेचा अभाव राहतो. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी विद्यापीठाने केलेली कारवाई महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयाची मान्यता, शैक्षणिक सुविधा, प्राध्यापकांची उपलब्धता, निकाल, प्लेसमेंट तसेच कौशल्यविकास उपक्रमांची माहिती घेणे आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी केले. केवळ आकर्षक जाहिराती किंवा कमी शुल्काच्या आधारावर महाविद्यालयाची निवड करणे भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कठोर भूमिका घेतल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार तसेच संपूर्ण विद्यापीठ प्रशासनाचे अभिनंदन केले. अशा प्रकारचे निर्णय इतर विद्यापीठांसाठीही प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“महाविद्यालयाची निवड करताना केवळ इमारत किंवा जाहिरातींकडे न पाहता शिक्षणाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. पदवी कागदावर मिळते; मात्र उज्ज्वल भविष्य गुणवत्तापूर्ण शिक्षणातूनच घडते,” असा संदेशही प्रा. डॉ. नितेशकुमार घुंगरवार यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!