
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| ग्रामीण भागातील गर्भवती महिलांवर वैद्यकीय उपचारांचा आर्थिक भार कमी व्हावा आणि माता-बाल आरोग्य अधिक सुरक्षित राहावे, या सामाजिक उद्देशातून हिमायतनगर येथील सेवा हॉस्पिटलच्या वतीने कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येत आहे.


या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या २६ तारखेला तालुक्यातील गर्भवती महिलांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी तसेच प्रत्येक गर्भवती महिलेला एक मोफत सोनोग्राफी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.


ग्रामीण भागातील अनेक महिलांना आर्थिक अडचणींमुळे वेळेवर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सेवा हॉस्पिटलने हा उपक्रम सुरू केला असून, त्याला परिसरातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


मोफत तपासणीसोबतच सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून माता व बाल आरोग्य जनजागृती अभियानही सातत्याने राबविण्यात येत आहे. गर्भावस्थेतील योग्य आहार, नियमित आरोग्य तपासणी, आवश्यक काळजी, वेळेवर औषधोपचार आणि सुरक्षित प्रसूती याबाबत महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले जाते.


आजच्या महागड्या वैद्यकीय उपचारांच्या काळात डॉ. विकास वानखेडे आणि डॉ. शिल्पा जाधव (वानखेडे) यांनी सुरू केलेली ही मोफत सेवा अनेक गरीब व गरजू कुटुंबांसाठी आर्थिक आणि मानसिक आधार ठरत आहे. या उपक्रमामुळे गर्भवती महिलांचे वेळेवर निदान होऊन माता व बाळाचे आरोग्य सुरक्षित राखण्यास मोठी मदत होत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या या सेवाभावी उपक्रमाचे हिमायतनगर तालुक्यासह परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत असून, डॉ. विकास वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
