
कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन, उगवण क्षमता तपासूनच पेरणीचा निर्णय घ्या
नांदेड, अनिल मादसवार| खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांनी घरचे किंवा बाजारातून खरेदी केलेले बियाणे थेट पेरणीसाठी न वापरता त्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. कमी पाऊस, बदलते हवामान आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांची गुणवत्ता तपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यंदाच्या हंगामात पावसाचे अनिश्चित स्वरूप लक्षात घेता एकदाच योग्य पेरणी होणे महत्त्वाचे आहे. निकृष्ट किंवा कमी उगवणक्षम बियाण्यामुळे रोपांची संख्या घटते, दुबार पेरणीचा खर्च वाढतो आणि उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी साध्या पद्धतीने बियाण्यांची चाचणी करून त्यांचा दर्जा निश्चित करावा, असे कृषी विभागाने म्हटले आहे.


गोणपाट पद्धतीने करा उगवण चाचणी
उगवण क्षमता तपासण्यासाठी बियाण्यातील १०० दाण्यांचा नमुना घ्यावा. हे दाणे ओल्या गोणपाटात गुंडाळून सावलीत ठेवावेत. सहा ते सात दिवस गोणपाट ओलसर राहील याची काळजी घ्यावी. त्यानंतर उगवलेल्या बियांची संख्या मोजावी. ७० टक्क्यांपेक्षा अधिक बिया उगवल्यास ते बियाणे पेरणीसाठी योग्य मानले जाते.


शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
उगवण क्षमता तपासल्यामुळे निकृष्ट बियाणे वेळेत ओळखता येते. पर्यायी बियाण्याची व्यवस्था करता येते, दुबार पेरणी टाळता येते आणि आवश्यक रोपसंख्या राखणे शक्य होते. परिणामी पिकाची वाढ, फुलोरा आणि परिपक्वता एकसमान होऊन उत्पादनात वाढ होते.


कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचे तसेच खरेदीची पावती जतन करण्याचे आवाहन केले आहे. योग्य बियाण्यांची निवड आणि उगवण चाचणी हीच यशस्वी खरीप हंगामाची पहिली पायरी असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.
