
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रशासनाचे आवाहन


नांदेड | राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आधार प्रमाणीकरण व अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक मोबाईलशी संलग्न करून आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शाहुराज हिरे यांनी केले आहे.


नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी पीक कर्जाची वेळेत परतफेड करू शकले नाहीत. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ही योजना लागू केली असून, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.


योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत देण्यात येणार आहे. तसेच सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्ज घेऊन वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.


ज्या शेतकऱ्यांची थकबाकी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे, त्यांना ‘एक रक्कमी समझोता’ योजनेद्वारे अतिरिक्त रक्कम भरून कर्जमाफीसाठी पात्र होण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत निश्चित करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना बँक खाते, मोबाईल क्रमांक, जमीन नोंदी आणि वारस नोंदी अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे. माहिती अपूर्ण राहिल्यास पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे आधार प्रमाणीकरण व अॅग्रीस्टॅक नोंदणीची प्रक्रिया विलंब न लावता पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
“पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवून ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी. शासनाच्या कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभाचा लाभ घेण्यासाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक आहे,” असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
