
पावसाअभावी वाढलेल्या उष्णतेमुळे प्रशासनाचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य


22 जूनपासून शाळांच्या वेळेत बदल, सकाळी 8 ते दुपारी 12.30 पर्यंत वर्ग


इयत्ता 1 ली ते 12 वीपर्यंतच्या सर्व शाळांना आदेश लागू
राज्य मंडळ, सीबीएसई व इतर सर्व बोर्डांचा समावेश
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
नांदेड | जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.


नवीन आदेशानुसार, 22 जून 2026 (सोमवार) पासून पुढील आदेशापर्यंत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी 8 ते दुपारी 12.30 या वेळेत भरविण्यात येणार आहेत. हा निर्णय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत उकाडा वाढला असून विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळेत शाळेत ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने शाळांचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला.


हा आदेश जिल्ह्यातील मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमासह राज्य मंडळ, सीबीएसई आणि इतर सर्व शैक्षणिक मंडळांच्या शाळांना लागू राहणार आहे. सर्व व्यवस्थापनांनी आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा अजूनही उच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात व अन्य आरोग्यविषयक समस्यांपासून संरक्षण मिळावे, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
