
योगाभ्यासातून निरोगी जीवनाचा संदेश; विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


हिमायतनगर | केंद्र शासन, महाराष्ट्र शासन तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या निर्देशानुसार शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात रविवारी (दि. 21 जून) 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.


महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. वसंत कदम यांनी योग प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.


योगाभ्यासाचे महत्त्व पटवून देताना डॉ. कदम यांनी सूर्यनमस्कार, प्राणायाम, ताडासन, धनुरासन, भुजंगासन यांसह विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, तणाव कमी होतो आणि निरोगी जीवनशैली विकसित होते, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. एम. पी. गुंडाळे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. आशिष दिवडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सह-कार्यक्रमाधिकारी प्रा. मुकेश यादव यांनी केले. या योग दिन कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
