मृग नक्षत्र उलटले, तरी पावसाचा पत्ता नाही; शेतकरी चातकाप्रमाणे आभाळाकडे

पेरणीची कामे रखडली : शेतकरी चिंतेत

पाणीपातळी खालावण्यास सुरुवात : पशू-पक्ष्यांनाही फटका

आभाळात ढगांची गर्दी, पण वरुणराजाची प्रतीक्षा अद्याप कायम

हिमायतनगर/नांदेड, अनिल मादसवार| मृग नक्षत्र लागून तब्बल १५ दिवस उलटले तरी नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी शेतकरी चिंतेत असून पेरणीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

रविवार (दि. २१) पासून वातावरणात काहीसा बदल जाणवू लागला आहे. काही भागांत थंड तर काही ठिकाणी उष्ण वारे वाहत असून आकाशात पावसाळी ढगांची गर्दी दिसत आहे. सायंकाळच्या वेळी आभाळ दाटून येत असले तरी अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे “केव्हा बरसणार वरुणराजा?” हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाला सतावत आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेताची मशागत पूर्ण करून पेरणीसाठी तयारी केली आहे. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे पेरणीला विलंब होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. वेळेत पाऊस न झाल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वाढत्या उकाड्यामुळे नागरिक, पशू-पक्षी आणि वन्यजीवही त्रस्त झाले आहेत. विहिरी, तलाव आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत घट झाल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून, जिथे पाणी आहे तेथीलही पातळी खोल गेल्याने टंचाई चा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान आभाळात ढगांची वर्दळ वाढल्याने पावसाची आशा निर्माण झाली असली तरी प्रत्यक्षात पावसाच्या सरी कोसळण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. “नको देवा राया अंत असा पाहू… बरस रे वरुणराजा बरस… तहानलेल्या धरतीची तहान भागविण्यासाठी तरी बरस,” अशी आर्त हाक शेतकरी आणि नागरिकांकडून दिली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!