बंडानंतर नागेश आष्टीकरांची पहिली प्रतिक्रिया; “अविश्वासामुळेच निर्णय, विकासासाठी सत्तेची साथ गरजेची”

मतदारसंघाच्या विकासासाठी घेतला निर्णय; कार्यकर्त्यांच्या नाराजीकडेही केले लक्षवेध

“पक्षाकडून अविश्वास दाखवला गेला” असा आरोप
विकासकामे रखडल्याने निर्णय घेतल्याचा दावा
“विकासासाठी सत्तेत असणे आवश्यक” अशी भूमिका
“मी कुठेही गेलो नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच आलो” असा खुलासा

नांदेड/हिंगोली | शिवसेनेतील राजकीय घडामोडींना वेग आला असताना बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडखोरीनंतर प्रथमच आपली भूमिका जाहीरपणे मांडली आहे. पक्ष नेतृत्वाकडून आमच्यावर अविश्वास दाखविण्यात आला, त्यानंतर पक्षात थांबून काहीही साध्य होणार नसल्याचे लक्षात आले. मतदारसंघातील विकासकामे रखडत असल्याने जनतेच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तीन दिवस नॉट रिचेबल असलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करतांना म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र विकासकामांना अपेक्षित गती मिळाली नाही. अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत गेली. परिणामी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षापासून दूर जाऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले.

“जनतेची रखडलेली कामे मार्गी लावायची असतील, मतदारसंघात अधिक निधी आणायचा असेल आणि विकासाला चालना द्यायची असेल तर सत्तेची साथ आवश्यक आहे. केवळ विरोधात राहून विकास साध्य होत नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, पक्षांतराच्या चर्चांवर बोलताना आष्टीकर यांनी, “मी कुठेही गेलो नाही. शिवसेनेतून शिवसेनेतच आलो आहे,” असे सांगत आपल्या निर्णयाचे समर्थन केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, आष्टीकर यांच्या भूमिकेमुळे हिंगोलीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!