नाव परिवर्तन जाहिरात देयकांचा घोळ; दोन वर्षांपासून शेकडो बिले प्रलंबित असल्याचा आरोप

नवीन नांदेड | सिडको क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नाव परिवर्तन जाहिरातींच्या देयकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, विविध दैनिके, साप्ताहिके आणि पाक्षिकांची शेकडो देयके गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे माध्यम प्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संबंधित विभागाने तात्काळ देयके लेखा विभागाकडे सादर करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाव परिवर्तन प्रक्रियेसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातींची बिले संबंधित वृत्तपत्रांनी नियमानुसार तीन प्रतींसह सादर केली आहेत. ही बिले जावक विभागामार्फत स्वीकारण्यात आली असली, तरी ती पुढील प्रक्रियेसाठी वेळेत पाठविण्यात आली नसल्याचा आरोप आहे. परिणामी, गेल्या दोन वर्षांतील मोठ्या प्रमाणातील देयके रखडल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, नाव परिवर्तन विभागात अनेक बिले विखुरलेल्या अवस्थेत असल्याची चर्चा असून, अलीकडेच त्यांची नोंदणी व वर्गवारी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम केवळ दिखाऊ स्वरूपाचे असून प्रत्यक्षात देयके निकाली काढण्यास विलंब होत असल्याचा आरोप संबंधितांकडून करण्यात येत आहे.

या संदर्भात सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता, केवळ दोन ते तीन महिन्यांचीच देयके प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनीही अशीच भूमिका मांडली. मात्र माध्यम प्रतिनिधी आणि संबंधितांकडून प्रत्यक्षात जवळपास दोन वर्षांपासून अनेक बिले थकीत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, संबंधित कर्मचारी कार्यालयीन कामकाजापेक्षा इतर कामांमध्ये अधिक व्यस्त असल्याची चर्चा असून, प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

नाव परिवर्तन जाहिरातींची देयके वेळेत न मिळाल्यामुळे अनेक वृत्तपत्र संस्थांवर आर्थिक ताण निर्माण झाला असून, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रलंबित देयकांचा तातडीने निपटारा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!