पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे रखडली; नागरिकांत नाराजी

नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप, तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातील विविध प्रभागांतील नाल्या तुडुंब भरलेल्या अवस्थेत असून पावसाळ्यापूर्वी होणारी नालेसफाईची कामे अद्यापही पूर्ण झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाल्यांमध्ये साचलेल्या घाणीमुळे पावसाचे पाणी घरांमध्ये शिरून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी गेल्या आठ दिवसांपासून नगरपंचायत प्रशासनाकडे नालेसफाईची मागणी लावून धरली आहे. मात्र काही ठिकाणी केवळ थातूरमातूर कामे करून चालढकल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या नाल्यांचे बांधकामही अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्यास मुख्य रस्त्यावर पाणी साचून शहरातील अनेक भागांना तलावाचे स्वरूप येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

oplus_48

मागील वर्षीही पावसाचे पाणी व नाल्यांतील घाण अनेक वॉर्डांमधील घरांमध्ये शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. ताप, सर्दी, डायरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेकांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते.

यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी नगरपंचायतीने तातडीने नालेसफाई व स्वच्छता मोहीम हाती घेऊन शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई पूर्ण करावी, अशी मागणी वामनराव पाटील वडगावकर यांनी केली आहे.

याबाबत नगरपंचायत कार्यालयाचे अधीक्षक महाजन यांनी सांगितले की, नालेसफाईसाठी नुकतीच मशीन उपलब्ध करून घेण्यात आली असून, प्रत्येक वॉर्डात टप्प्याटप्प्याने स्वच्छता मोहीम सुरू आहे.

नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, पावसाळा तोंडावर आला असताना स्वच्छता कामांना अधिक गती देऊन शहरातील सर्व नाल्यांची तातडीने साफसफाई करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!