प्रलंबित पांदण रस्त्यांसाठी उद्या हिमायतनगर तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील प्रलंबित पांदण रस्ते मोकळे करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उद्या, दि. 18 जून 2026 रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर करणार आहेत.

गुरुवारी सकाळी 11 वाजता हिमायतनगर तहसील कार्यालय परिसरात होणाऱ्या या आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी प्रशासनाकडे तक्रारी, अर्ज अथवा मागण्या करूनही अद्याप प्रश्न निकाली निघालेला नाही, अशा शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी पांदण रस्त्यांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना शेतीकामे, वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारात अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून वारंवार निवेदने देऊनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून पांदण रस्त्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

“पांदण रस्ते मोकळे झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही,” असा इशारा तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी दिला असून, शेतकरी बांधवांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

(सांकेतिक/AI जनरेट फोटो) – प्रलंबित पांदण रस्त्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या अर्धनग्न आंदोलनाचे प्रतीकात्मक चित्र. AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!