नांदेड महापालिकेचे गोदावरी प्रदूषण नियंत्रणासाठी मोठे पाऊल

२२ प्रमुख नाल्यांतील सांडपाणी नदीत जाणे रोखण्यात यश; आयुक्त डॉ. डोईफोडे यांचा आढावा
नांदेड | शहराची जीवनवाहिनी आणि धार्मिक दृष्ट्या पवित्र मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेने हाती घेतलेल्या विविध उपाययोजना प्रगतीपथावर असून, २२ प्रमुख नाल्यांमधून थेट नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यात महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विशेष आढावा बैठक पार पडली. बैठकीत गोदावरी नदी प्रदूषण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

महापालिकेने नदीकाठालगत ३.३ किलोमीटर लांबीची आणि १२०० मिमी व्यासाची मलवाहीनी उभारली असून, १७ इंटरसेप्ट स्ट्रक्चर्सद्वारे सांडपाणी अडवून ते मलशुद्धीकरण केंद्रांकडे वळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बोंढार, इलिचपूर, सांगवी आणि डंकीन येथील मलशुद्धीकरण प्रकल्पांची क्षमता वाढवून ते अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले.

चुनाल नाल्यावर १० एमएलडी क्षमतेचा नवीन मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला असून, बंदाघाट ते गोवर्धनघाट दरम्यान ३ एमएलडी क्षमतेची पॉकेट एसटीपी केंद्रेही कार्यान्वित करण्यात आली आहेत. दक्षिण भागातील सहा नाले आरसीसी पाइपलाइनद्वारे वसरणी उपसा केंद्राकडे वळविण्यात आले आहेत.

नदीपात्रातील निर्माल्य आणि कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी जुना मोंढा आणि गोवर्धन घाट पुलांवर १० फूट उंचीचे सुरक्षा जाळे बसविण्यात आले आहे. तसेच प्रमुख घाटांवर विशेष स्वच्छता पथके तैनात करून निर्माल्य कलश उभारण्याचे निर्देशही देण्यात आले.

पावसाळ्यात सांडपाणी आणि कचरा नदीत वाहून जाऊ नये यासाठी सर्व नाले व ड्रेनेज लाईनची युद्धपातळीवर स्वच्छता करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. नदीतील जलपर्णी नियंत्रण आणि पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी (DO) योग्य राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले.

नागरिकांना आवाहन
गोदावरी नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता टिकवून ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगत आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी नागरिकांना नदीत प्लास्टिक, कचरा, कपडे किंवा निर्माल्य टाकू नये, असे आवाहन केले. पर्यावरणप्रेमी संस्था आणि नागरिकांच्या सूचनांचे स्वागत केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पर्यावरण तज्ज्ञ, जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य तसेच गंगा-गोदावरी स्वच्छता संकल्प अभियानाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!