टोल वसुली सुरू; मात्र जीवघेण्या भेगांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

रस्ते दुरुस्त न झाल्यास टोल नाका बंद आंदोलनाचा इशारा – वामनराव पाटील वडगावकर

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड–किनवट मार्गावरील भोकर, हिमायतनगर, सेंटर पॉइंट, पोटा आणि सोनारी परिसरातील टोल नाक्यांवर वाहनधारकांकडून नियमितपणे टोल वसुली केली जात असताना, दुसरीकडे रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या भेगांकडे संबंधित प्रशासन व टोल कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी केला आहे.

या मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून, त्या दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत आहेत. काही ठिकाणी या भेगा सुमारे सहा इंच रुंद असून शंभर ते दोनशे फूट लांबीपर्यंत सलग पसरलेल्या आहेत. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी पाच ते सहा भेगा पडल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.

दुचाकी, तीनचाकी, कार तसेच अवजड वाहन चालकांना या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहन सावधपणे चालवत असतानाही अचानक टायर भेगेत गेल्यास वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. अनेकदा वाहन दुसऱ्या वाहनावर जाऊन धडकण्याची किंवा चालक खाली पडून गंभीर जखमी होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

टोल वसुली करणाऱ्या संबंधित कंपनीने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या धोकादायक भेगा भरून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वामनराव पाटील वडगावकर यांनी केली आहे.

येत्या चार ते पाच दिवसांत दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, तर जनहितासाठी टोल नाका बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासन व टोल व्यवस्थापनाची राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. “जनतेच्या सुरक्षिततेसाठी प्रथम रस्ता दुरुस्त करा, मगच टोल वसूल करा,” अशी तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!