
पेरणीसाठी शेतकरी सज्ज, मात्र वरुणराजाच्या आगमनाकडे लागल्या नजरा


हिमायतनगर, अनिल मादसवार| मृग नक्षत्राची सुरुवात होऊन तब्बल सात दिवस उलटून गेले असतानाही हिमायतनगर शहरासह तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा दिवसेंदिवस मावळताना दिसत असून, वरुणराजाच्या कृपादृष्टीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची सर्व कामे पूर्ण केली असून, बियाणे व खतांची खरेदीही करून ठेवली आहे. अनेक शेतकरी पेरणीसाठी पूर्णपणे सज्ज झाले असले, तरी पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने पेरणी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


दरवर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाची दमदार सुरुवात होत असते. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. शेतकऱ्यांमध्ये “पड रे पाण्या पड रे…”, “ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा…” अशी गाणी म्हणत वरुणराजाला साकडे घालण्याची वेळ आली असल्याची भावना व्यक्त होत आहे.


पावसाअभावी शेतकऱ्यांमध्ये आर्थिक चिंता वाढू लागली असून, लवकरच चांगला पाऊस होऊन खरीप हंगाम सुरळीत मार्गी लागावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
तर ग्रामीण भागात वरून राज्याची कृपा व्हावी यासाठी देवी – देवतांना साकडे घालून घट मांडणे… धोंडी धोंडी पाणी दे… असे म्हणत जेवणाच्या पंगती करून वरून राजाला साकडे घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
