हिमायतनगर शिवारात लांडग्याचा धुमाकूळ; शेतकऱ्याचे वासरू फाडून ठार

वनविभागाचा पंचनामा; नुकसानभरपाईसह गस्त वाढविण्याची शेतकऱ्यांची आक्रमक मागणी

हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी रस्त्यालगतच्या शेतशिवारात लांडग्याने पुन्हा धुमाकूळ घालत एका शेतकऱ्याच्या एक वर्षीय वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना शनिवारी दिनांक  १३ च्या पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

माहितीनुसार, हिमायतनगर येथील शेतकरी नागेश्वर शंकरराव ढोणे यांच्या बोरगडी रस्त्यालगत असलेल्या आखाड्यावर शनिवारी पहाटे सुमारे चार वाजताच्या दरम्यान लांडग्याने हल्ला चढवला. गोठ्याजवळ बांधलेल्या एक वर्षीय वासरावर हल्ला करून त्यास ठार करण्यात आले. सकाळी शेतकरी आखाड्यावर आल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतील वासरू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच वनपाल सुनील मेटकर व वनरक्षक नंदकिशोर एमजलवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र, केवळ पंचनाम्यावर न थांबता वनविभागाने अशा घटनांवर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

सतत वाढत असलेल्या वन्य प्राण्यांच्या वावरामुळे शेतकरी आणि पशुपालक भयभीत झाले असून, जनावरांचे संरक्षण करणे मोठे आव्हान बनले आहे. पशुधन हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक कणा मानले जाते. अशा घटनांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी नागेश्वर ढोणे यांनी केली आहे.

दरम्यान, शिवार परिसरात लांडग्याचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने तातडीने गस्त वाढवून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!