नांदेड आकाशवाणी केंद्राच्या बळकटीकरणासाठी अशोकराव चव्हाण सरसावले

“तरंग लांबी वाढविणे, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी दिल्लीस्तरावर पाठपुरावा करणार”

नांदेड| माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांनी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या विकासासाठी सकारात्मक आणि ठोस भूमिका घेत केंद्राच्या विविध प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देण्याची ग्वाही दिली आहे. नांदेड आकाशवाणी केंद्राची तरंग लांबी वाढविणे, ग्रामीण भागात स्पष्ट आणि दर्जेदार प्रसारण उपलब्ध करून देणे, तसेच स्थानिक कलाकार, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पुन्हा व्यापक व्यासपीठ मिळावे यासाठी आपण स्वतः केंद्रीय मंत्र्यांसह प्रसार भारतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गुणवंतराव पाटील, गोविंदराव मुंडकर, भाऊराव मोरे, बसवराज वडिले आणि प्रकाश कराळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी 3 जून 2026 रोजी बुधवारी सविस्तर चर्चा करताना चव्हाण यांनी नांदेड आकाशवाणी केंद्र हे केवळ प्रसारण माध्यम नसून मराठवाड्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक जीवनाचे महत्त्वपूर्ण केंद्र असल्याचे नमूद केले. “ग्रामीण भागातील लोककला, साहित्य, सामाजिक जाणीवा आणि स्थानिक प्रतिभेला आवाज देण्याचे मोठे कार्य या केंद्राने अनेक वर्षे केले आहे. या परंपरेला नवसंजीवनी देण्याची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले.

चव्हाण यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकारातून वसरणीच्या माळावर सुरू झालेले नांदेड एफएम केंद्र हे मराठवाड्याच्या सांस्कृतिक विकासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील कलाकार, शेतकरी, विद्यार्थी, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम उपलब्ध झाले. आजही अनेक ज्येष्ठ नागरिक, श्रोते आणि कलाकार या केंद्राशी भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत.

यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील प्रसारण समस्येकडे विशेष लक्ष वेधले. “तरंग लांबी कमी असल्यामुळे अनेक गावांमध्ये आकाशवाणीचे कार्यक्रम स्पष्ट ऐकू येत नाहीत. माहिती, शिक्षण, कृषी मार्गदर्शन, संस्कृती आणि लोकजागृतीसाठी आकाशवाणीची भूमिका आजही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रसारण क्षमता वाढविणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक कलाकारांसाठी पूर्वी सुरू असलेले सकाळ आणि संध्याकाळचे कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. “ग्रामीण भागात असंख्य प्रतिभावान कलाकार आहेत. लोकगीत, भारूड, कथा, साहित्य, सामाजिक विषय आणि युवकांच्या कलागुणांना आकाशवाणीमुळे व्यापक व्यासपीठ मिळू शकते. स्थानिक कलाकारांना संधी देणे म्हणजे मराठवाड्याच्या संस्कृतीचे जतन करणे होय,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी आकाशवाणीच्या प्रशासनालाही सकारात्मक सूचना दिल्या. “अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर वास्तव्यास राहून नागरिक, श्रोते आणि कलाकारांशी थेट संवाद साधला पाहिजे. प्रत्यक्ष समस्यांची माहिती घेतल्यास अधिक प्रभावीपणे सुधारणा करता येतील,” असे त्यांनी नमूद केले.

आकाशवाणीच्या दर्जेदार कार्यक्रमांसाठी सल्लागार समिती अधिक सक्रिय करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानिक कलाकार, पत्रकार, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवून कार्यक्रमांची गुणवत्ता अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शिष्टमंडळाने यावेळी नांदेड आकाशवाणी केंद्र अधिक लोकाभिमुख करण्यासाठी अनेक विधायक सूचना मांडल्या. त्यामध्ये ग्रामीण भागासाठी स्वतंत्र कार्यक्रम, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष मालिका, स्थानिक कलाकारांना नियमित संधी, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील चर्चासत्रे, तसेच प्रसारण क्षमता वाढविण्याच्या मागण्या प्रमुख होत्या.

दरम्यान, नांदेड आकाशवाणी केंद्राबाबत जनतेमध्ये नव्याने आशावाद निर्माण झाला असून, केंद्राचे वैभव पुन्हा प्राप्त व्हावे अशी भावना व्यक्त होत आहे. अशोकराव चव्हाण यांनी हा विषय दिल्लीस्तरावर मांडण्याची तयारी दर्शवल्यामुळे नांदेड आकाशवाणी केंद्राच्या विकासाला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!