
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठपुरावा
युरिया ₹266 तर डीएपी ₹1350 दराने उपलब्ध करण्याचे आदेश
शेतकऱ्याकडून जादा वसुली सहन केली जाणार नाही


हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर शहर व तालुक्यात खतांच्या वाढीव दराबाबत शेतकऱ्यांकडून सातत्याने तक्रारी येत असताना कृषी विभागाने बुधवारी अखेर हस्तक्षेप करत विक्रेत्यांना शासनाने निश्चित केलेल्या दराने खत विक्री करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी शहर व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती.


दि. ३ जून बुधवारी रोजी सकाळपासून अनेक शेतकऱ्यांनी खतांच्या जादा दराबाबत तक्रारी केल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित खत विक्रेत्यांशी बैठक घेऊन शासनमान्य दराने खत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार युरिया खत ₹266 प्रति पोते, तर डीएपी खत ₹1350 प्रति पोते या निश्चित दराने विक्री करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच इतर खतांची देखील विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच करण्याचे निर्देश देण्यात आले.


या निर्णयामुळे बुधवारी जवळपास २०० ते ३०० शेतकरी बांधवांना थेट दिलासा मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. भविष्यातही तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याला खतासाठी जादा पैसे मोजावे लागू नयेत, यासाठी कृषी विभाग सतर्क राहणार असल्याचे कृषी विभागाचे अधिकारी मारोती काळे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. यावेळी शेतकऱ्यांना खत खरेदी करताना दराची खात्री करण्याचे, अधिकृत बिल घेण्याचे आणि कोणीही जादा दर आकारत असल्यास तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांच्या विक्रीत अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात खत, बियाणे व इतर कृषी निविष्ठा खरेदी करताना विशेष सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले. “शेतकरी हितासाठी संघर्ष कायम राहील. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही,” अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शहर व ग्रामीण भागातील शेतकरी उपस्थित होते.
