कारला गावच्या बोंपिलवार बंधूंची शैक्षणिक भरारी; संगीत विषयात दोघांनी संपादन केली पीएच.डी. पदवी

प्रा. ज्ञानेश्वर व प्रा. नामदेव बोंपिलवार यांचे यश; कारला गावासह हिमायतनगर तालुक्याचा वाढवला गौरव

हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील कारला गावातील बोंपिलवार (कार्लेकर) परिवारासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या उल्लेखनीय यशात दोन सख्ख्या बंधूंनी संगीत विषयात विद्यापीठाची पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी संपादन केली आहे. प्रा. ज्ञानेश्वर रामदास बोंपिलवार आणि प्रा. नामदेव रामदास बोंपिलवार यांनी संगीत विषयातील सखोल संशोधनाच्या जोरावर अमरावती विद्यापीठाची सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्राप्त केली असून, त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या अभ्यास, संशोधन आणि संवर्धनासाठी दोन्ही प्राध्यापकांनी दीर्घकाळ सातत्यपूर्ण संशोधन कार्य केले आहे. संगीत क्षेत्रातील विविध पैलूंचा अभ्यास करून त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानाची भर घातली आहे. त्यामुळे त्यांच्या या यशामुळे केवळ परिवाराचाच नव्हे, तर संपूर्ण कारला गाव, हिमायतनगर तालुका आणि संगीत क्षेत्राचा गौरव वाढला आहे.

प्रा. ज्ञानेश्वर रामदास बोंपिलवार यांनी डॉ. कौमुदी क्षीरसागर-बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वातंत्र्योत्तर कालखंडातील अकोला जिल्ह्याचे समग्र सांगीतिक योगदान’ या विषयावर उच्च दर्जाचे संशोधन पूर्ण करून आचार्य (Ph.D.) पदवी संपादन केली. ते सध्या खामगाव येथील श्रीमती सुरजदेवी रामचंद मोहता महिला महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधनामुळे संगीत विषयाच्या अभ्यासाला नवी दिशा मिळण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

तर प्रा. नामदेव रामदास बोंपिलवार यांनी डॉ. शिरीष कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग्वाल्हेर घराण्याचे आचार्य विश्वनाथ रिंगे यांच्या सांगीतिक कार्याचे विस्तृत अध्ययन’ या विषयावर शोधप्रबंध सादर करून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. संगीत शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक जतनासाठी त्यांनी केलेले कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

एका कुटुंबातील दोन सख्ख्या बंधूंनी एकाच विषयात डॉक्टरेट पदवी संपादन करणे ही अत्यंत दुर्मीळ आणि गौरवास्पद बाब मानली जात आहे. “ज्ञान, साधना आणि संशोधन यांच्या बळावर मिळवलेले हे यश पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” अशा भावना ग्रामस्थ, संगीतप्रेमी आणि मान्यवरांनी व्यक्त करत बोंपिलवार बंधूंचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!