
हिमायतनगरमधील छोट्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर; पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय कारवाई टाळण्याचे प्रशासनाला आवाहन


हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर शहरातील संभाव्य अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद यांनी प्रशासनाने घाईघाईने कठोर कारवाई न करता मानवी दृष्टिकोन स्वीकारावा, अशी भूमिका मांडली आहे. शहरातील अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह छोट्या व्यवसायांवर अवलंबून असल्याने अतिक्रमण हटविताना त्यांच्या रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने विचारात घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.


ALM Bharat शी बोलतांना मोहम्मद जावेद यांनी सांगितले की, हिमायतनगरमधील अनेक नागरिक टपऱ्या, पानटपऱ्या, भाजीपाला विक्री, चिकन-मटन विक्री तसेच विविध लहान-मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वाढती महागाई, बेरोजगारी आणि मर्यादित रोजगार संधी यामुळे हे छोटे व्यवसाय अनेक कुटुंबांसाठी जीवनाचा आधार बनले आहेत.


“अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली अचानक कारवाई केल्यास अनेक गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. प्रशासनाने केवळ नियमांचा विचार न करता मानवी संवेदनाही लक्षात घेतल्या पाहिजेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.


शहरातील वाहतूक, नियोजन आणि रस्ते मोकळे करण्याची गरज नाकारता येत नसली, तरी त्यासाठी गरीबांच्या हातातील रोजगार हिरावून घेणे हा उपाय ठरू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. प्रशासनाने प्रथम संबंधित व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
“विकास आवश्यक आहे; मात्र विकासाच्या नावाखाली सर्वसामान्यांचे जगणे उद्ध्वस्त होता कामा नये. गरीबांच्या हातातील रोजगार काढून घेऊन शहराचा विकास साधता येणार नाही. विकासासोबत सामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहाचाही समतोल राखला गेला पाहिजे,” असे मत मोहम्मद जावेद यांनी व्यक्त केले.
हिमायतनगरमधील अनेक नागरिकांचे जीवन छोटे व्यवसाय आणि हातावर पोट असलेल्या रोजगारांवर अवलंबून असल्याने प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून समन्वयाने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
